उमरेड : बाल राज्य नाट्य स्पर्धेत मुंबईपर्यंत झेप घेणाऱ्या बाम्हणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. बाम्हणी (ता.उमरेड) येथील लाल बहाद्दुर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चक्रधर नामदेव ठवकर यांना मरणोपरांत पीएच.डी मिळाली. त्यांचे वडील नामदेव ठवकर यांनी हा सत्कार स्वीकारला. कोरोनामुळे १ जूनला चक्रधर ठवकर यांचे निधन झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात नामदेव ठवकर यांनी ही पीएचडी स्वीकारली. डॉ. चक्रधर ठवकर यांनी महानुभाव पंथावर आधारित विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. डॉ. राजेंद्र वाटाणे त्यांचे मार्गदर्शक होते. विद्यापीठाच्या वतीने महंत नागराज बाबा ‘सुवर्णपदक’ देऊन ठवकर यांना गौरवान्वित करण्यात आले.
आनंदी सोहळ्याला दु:खाची किनार असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत हा सोहळा वेदनादायी होता, अशा भावना पत्नी विद्या यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे चक्रधर ठवकर आमच्यात नाहीत, हे शल्य अनेकांना बोचणारेच ठरत असून त्यांनी बाम्हणी सारख्या गावात जपलेल्या शैक्षणिक कार्याचा आम्हा सर्वांना अभिमानही वाटतो, असेही मत विद्या ठवकर यांनी व्यक्त केले.