नागपूर : मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार यंदा सदानंद फुलझेले यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि पवित्र दीक्षाभूमीच्या निर्मितीसाठी त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मारवाडी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पाच लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. फुलझेले यांनी आयुष्यभर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार केला. बाबासाहेबांनी नागपुरात धम्मदीक्षा देण्याचा कार्यक्रम आयोजित केला त्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. दीक्षाभूमीच्या निर्मितीसाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता येण्यासारखे नाही. बाबासाहेबांवर श्रद्धा ठेवून कष्टाने त्यांनी दीक्षाभूमीचा विकास केला. त्यांना हा पुरस्कार जाहीर करताना मारवाडी फाऊंडेशनला आनंद वाटतो, असे गांधी म्हणाले. याप्रसंगी पत्रकार परिषदेला सत्यनारायण नुवाल, श्रीकृष्ण चांडक, गोविंद अग्रवाल, महेश पुरोहित, राजेंद्र अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सदानंद फुलझेले यांना डॉ. आंबेडकर पुरस्कार जाहीर
By admin | Published: April 18, 2015 2:36 AM