लोकमत एक्सक्लुसिव
आशीष दुबे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचा परीक्षा विभाग पुन्हा एकदा परीक्षांवरून अडचणीत आहे. त्याचे कारण आहे ऑनलाइन परीक्षा. विद्यापीठाकडे ऑनलाइन परीक्षेसाठी आवश्यक सर्व्हर आणि सेटअपचीही बाेंब आहे. अशा वेळी ऑनलाइन परीक्षा घ्यायची तरी कशी, हा माेठा प्रश्न आहे. कारण हिवाळी परीक्षेत विषय आणि विद्यार्थी दाेघांचीही संख्या अधिक असणार आहे.
‘लाेकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार मागील परीक्षेच्या तुलनेत यावेळी ऑनलाइन परीक्षेत चारपट अधिक विद्यार्थी सहभागी हाेणार आहेत. विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार साडेचार लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. एकूण ८०० पेक्षा अधिक विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. एवढे विषय आणि विद्यार्थीसंख्या असताना प्रश्नपत्रिका तयार करणे हेच पहिले आव्हान ठरणार आहे. कारण २०२०च्या उन्हाळी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करताना विद्यापीठाच्या शिक्षकांना घाम फुटला हाेता. उल्लेखनीय म्हणजे उन्हाळी परीक्षेमध्ये अंतिम वर्षाचे व सेमिस्टरचे ७० हजार विद्यार्थी सहभागी हाेते. आता ४.५० लाख विद्यार्थ्यांसाठी काय हाेईल, हा माेठा प्रश्न आहे.
अभ्यासक्रमांची संख्या अधिक असणे हे दुसरे आव्हान आहे. अशा वेळी काही तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा स्थगित करण्याचा प्रसंग आला तर पुन्हा परीक्षा घेण्यासाठी अधिक वेळ लागेल व मनस्ताप हाेईल. यामुळे २०२१च्या उन्हाळी परीक्षा आयाेजनात अडचणी येऊ शकतात. याचे थेट परिणाम २०२१-२२च्या शैक्षणिक सत्रावर हाेतील. आणखी एक अडचण म्हणजे अभ्यासक्रम अधिक असल्याने एकएका विषयासाठी प्रश्नपत्रिकांचे तीन तीन सेट तयार करावे लागतात. या प्रश्नपत्रिकांना अपलाेड करणे व ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाकडे पुरशी यंत्रणाच नाही. २०२०च्या परीक्षेत विद्यापीठाची लाज प्राेमार्क कंपनीने वाचविली हाेती. त्यामुळे संपूर्ण राज्यात केवळ नागपूर विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांचे यशस्वी आयाेजन केले. इतर विद्यापीठ ऑनलाइन परीक्षांचे आयाेजन करण्यात अपयशी ठरले. यावेळी काय हाेईल, हे सांगता येत नाही. याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांच्याशी संपर्क हाेऊ शकला नाही.
सर्व व्यवस्थित हाेईल
या प्रश्नावर राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षणमंत्री उदय सावंत यांनी विद्यापीठाचा बचाव केला. परीक्षांचे आयाेजन याेग्य पद्धतीने हाेईल, असा विश्वास त्यांनी दिला. यापूर्वी विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेतली नव्हती आणि अनुभवही नव्हता. मात्र आता अनुभव आहे आणि तयारीही व्यवस्थित हाेईल. त्यामुळे परीक्षा काेणत्याही अडचणीशिवाय पार पडतील, असा भराेसा त्यांनी दिला.
प्राधिकरणांची मंजुरी आवश्यक
ऑनलाइन परीक्षा घेण्यापूर्वी विद्यापीठाला विविध प्राधिकरणांमध्ये प्रस्ताव पारीत करावा लागेल. मागील अनुभवांचा विचार करता प्राधिकरणांकडून ऑनलाइन परीक्षांसाठी मंजुरी मिळणे कठीण वाटत आहे. विशेष म्हणजे परीक्षा विभागाला हा प्रस्ताव आधी विद्वत परिषदेत सादर करावा लागेल. येथे मंजुरी मिळाल्यानंतर प्रबंधन परिषदेची मंजुरी प्राप्त करावी लागेल आणि त्यानंतर पुन्हा परीक्षा मंडळाकडून मंजुरी मिळवणे बंधनकारक असेल.
सध्या कुणावरही जबाबदारी नाही
विद्यापीठाने सध्या तरी परीक्षा आयाेजनाची जबाबदारी कुणाला द्यावी, याबाबत निर्णय घेतलेला नाही. उन्हाळी परीक्षेची जबाबदारी प्राेमार्क कंपनीला दिली हाेती. या कंपनीने विद्यापीठाला नि:शुल्क ॲप तयार करून दिला हाेता. सूत्राच्या माहितीनुसार कंपनीसाेबतचा विद्यापीठाचा करार संपलेला आहे. त्यामुळे परीक्षा ॲपद्वारे हाेईल की कॉम्प्युटरद्वारे, यावर अद्याप निर्णय झालेला नाही.