अंकिता देशकर
नागपूर : उपराजधानीत २०१८ पासून ते २०२० पर्यंत सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींचा क्रम वाढता होता. २०२१ मध्ये मात्र एक हजाराने घट झाली आहे. हा व्यापक जनजागृतीचा परिणाम असल्याचे मत पोलीस विभागाकडून होत आहे. ८ फेब्रुवारीला सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर ही घट दिलासादायक ठरली आहे.
सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्ह्यांमध्ये ऑनलाईन आर्थिक फसवणूक, सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ प्रसारण, पीडितांना ऑनलाईन ब्लॅकमेलिंग, इंटरनेटच्या माध्यमातून गोपनीय माहितीची चोरी इत्यादीचा समावेश होतो. गेल्या वर्षी सायबर सेलने शाळा व महाविद्यालयांकरिता ४०, खासगी संस्थांकरिता १९ आणि सामान्य नागरिकांसाठी १७ मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
दरवर्षी साजरा होतो दिवस
युरोपियन कमिशन वेबसाईटच्या वतीने दरवर्षी सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा केला जातो. इंटरनेटचा सुरक्षित व जबाबदारीने उपयोग करण्याविषयी जगभर जनजागृती करणे, हा यामागील उद्देश आहे. या उपक्रमामुळे सायबर गुन्ह्यांना बळी पडणाऱ्यांची संख्या कमी होत आहे.
इंटरनेट वापरताना ही काळजी घ्या
- वैयक्तिक माहिती स्ट्राँग पासवर्डने सुरक्षित करा.
- पासवर्ड कुणालाही सांगू नका.
- इंटरनेटसाठी सुरक्षित उपकरणे वापरा.
- सॉफ्टवेअर नियमित अपडेट करा.
- वायफायचा सतर्क राहून उपयोग करा.
- टू-फॅक्टर ऑथेंटीफिकेशन पूर्ण करा.
- वैयक्तिक डेटाचा बॅकअप घ्या.
- सुरक्षित वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी करा.