लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला सोमवारी दुपारी बाहेर काढण्यात आले. ही मादी असून एक वर्षाची आहे. पारशिवनी वनपरिक्षेत्रातील टेकाडी शिवारात ही घटना घडली.ईश्वर गिरधर मांडारे यांच्या शेतातील विहिरीत सकाळी एक बिबट पडल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे वनमजूर एस.आर. भोयर यांनी ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. बैंगणे यांना दिली. सहायक वनसंरक्षक एस. बी. गिरी यांनी ही माहिती वनसंरक्षक प्रभू नाथ शुक्ल यांना कळविली. तिला सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धस्तरावर हालचाली सुरू झाल्या. मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांना कळवून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे रेस्क्यू पथक सकाळी ११ वाजता घटनास्थळी पोहचले. पथकातील कर्मचाऱ्यांनी विहिरीत पिंजरा टाकून बिबट्याला आत घेण्याचा प्रयत्न केला. तब्बल तासाभराच्या परिश्रमानंतर एकदाचा बिबट्याने आत प्रवेश केला.बाहेर काढल्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. ती ठणठणीत असल्याचे लक्षात आल्यावर या बिबट मादीला १२.५० वाजता पारशिवनी वनपरिक्षेत्रातील बफर क्षेत्राजवळ निसर्गमुक्त करण्यात आले. या पथकात डॉ. मयूर काटे, डॉ. सय्यद बिलाल, समीर नेवारे, सिद्धांत मोरे, वनपाल कैलाश जमगाडे, वनरक्षक दिनेश बोरकर, वनरक्षक मिलिंद वनकर, वनरक्षक अनिता कातखडे, वनरक्षक नारायण मुसळे, मदतनीस विलास मंगर, बंडू मंगर, शुभम मंगर, चेतन बावसकर, वाहनचालक आशिष महल्ले यांचा समावेश होता.
विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 10:08 PM