नागपूर : रेल्वे गाड्यांच्या संचलन प्रक्रिये दरम्यान काय आणि कशी खबरदारी घ्यावी, याची माहिती देण्याच्या उद्देशाने 'सुरक्षित ट्रेन ऑपरेशन आणि वैयक्तिक सुरक्षा' या विषयावर सेफ्टी सेमिनार घेण्यात आला.
विविध मार्गावर रेल्वे गाड्यांची रात्रंदिवस धावपळ सुरू असते. रेल्वे गाड्या चालविणारे लोको पायलट, संबंधित कर्मचारी आणि गार्ड हेच केवळ गाड्यांच्या संचलनात सहभागी नसतात. तर, स्टेशन मास्तर पासून ट्रॅक मॅन पर्यंत अनेकांचा ट्रेन ऑपरेशन मध्ये सक्रिय सहभाग असतो. यातील एखाद्याचाही दुर्लक्षितपणा आणि किरकोळ चूक मोठा धोका निर्माण करू शकते. त्यामुळे सुरक्षित ट्रेन ऑपरेशन दरम्यान व्यक्तीगत सुरक्षा कशा पद्धतीने घ्यायची, काय करायचे आणि काय टाळायचे, या संबंधाने अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती व्हावी म्हणून कळमेश्वर रेल्वे स्थानकावर बुधवारी सेफ्टी सेमिनार घेण्यात आला.
यात उप मुख्य सुरक्षा अधिकारी (एस अँड टी), वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी, सहाय्यक परिचालन व्यवस्थापक, सहाय्यक विभागीय सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, सुरक्षा परिषद अधिकारी (ट्रॅफिक), वाहतूक निरीक्षक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. शंटिंग मॅन्युव्हर्स दरम्यान खबरदारी, भारांचे योग्य स्थिरीकरण आणि त्यानंतरच्या क्लिअरन्स, पेट्रोलिंग प्रोटोकॉल आणि असामान्य घटनांना कसा प्रतिसाद द्यायचा, कर्तव्यादरम्यान कर्मचाऱ्यांनी वैयक्तिकरित्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे कशी पाळायची या संबंधाने वेगवेगळ्या टीप्स देण्यात आल्या. अलिकडे झालेल्या काही घटनांवर चर्चा करून त्या घटनांचा अहवाल (केस स्टडी) यावेळी मांडण्यात आला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची, शंका कुशंकांचेही परिसंवादात निरसन करण्यात आले.