नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावरील पश्चिमेकडील भागातील बॅग स्कॅनर मशीन दोन महिन्यापासून बंद असल्यामुळे प्रवासी आपले सामान विना तपासणी आत नेत आहेत. यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर पूर्व आणि पश्चिमेकडील भागात दोन बॅग स्कॅनर मशीन आहेत. प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करताना या मशीनमध्ये आपल्या बॅगची तपासणी करावी लागते. परंतु मागील दोन महिन्यापासून पश्चिमेकडील भागात असलेली बॅग स्कॅनर मशीन बंद पडली आहे. ही मशीन बंद असल्यामुळे प्रवासी आपले सामान तपासणी न करताच रेल्वेस्थानकाच्या आत नेत आहेत. याचा फायदा घेऊन असामाजिक तत्त्व शस्त्र, दारूची तस्करी करू शकतात. काही वर्षांपूर्वी बॅग स्कॅनरमुळे ४५ लाख रुपये घेऊन जात असलेल्या आरोपीला आरपीएफने अटक केली होती. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील बॅग स्कॅनर मशीन सुरू असणे गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक आहे. परंतु मागील दोन महिन्यापासून बंद असलेली मशीन अद्यापही सुरू झालेली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
..........
लवकरच सुरू होणार मशीन
‘बॅग स्कॅनर मशीनचे स्पेअर पार्ट खराब झाल्यामुळे मशीन बंद आहे. या मशीनच्या देखभालीचे कंत्राट रॅपिस्कॅन कंपनीला दिलेले आहे. मशीन दुरुस्त करण्याबाबत कंपनीला कळविण्यात आले असून, लवकरच ही मशीन सुरू करण्यात येईल.’
-आशुतोष पांडे, विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
..........