लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधानसभा निवडणुकांमध्ये नागपूर जिल्ह्यात मतदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विश्वास दाखवत महायुतीच्या बाजूने कौल दिला. महायुतीने नऊ जागांवर विजय मिळविला, यात भाजपने ८ तर शिंदेसेनेला १ जागा मिळाली.
सावनेरमध्ये माजी मंत्री सुनील केदार, काटोलमध्ये माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या वर्चस्वाला महायुतीने सुरुंग लावला. या दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. तर रामटेकच्या गडावर काँग्रेससोबत बंडखोरी करणाऱ्या राजेंद्र मुळक आणि काटोलमध्ये काँग्रेसच्या याज्ञवल्क्य जिचकार यांनाही धक्का बसला.
नागपूर ग्रामीणमध्ये महाविकास आघाडीला केवळ उमरेडमध्येच विजय मिळाला. तर भाजपला शहरात गेल्यावेळीप्रमाणे चार जागा राखण्यात यश आले. राज्यातील सर्वांत 'हायप्रोफाइल' जागा असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३९ हजार ७१० मतांनी विजय मिळवित विजयाचा षटकार मारला. दक्षिण नागपूर व मध्य नागपूरच्या लढतीत चुरस होती. येथे दिवसभर कधी महाविकास आघाडी तर कधी महायुतीकडे पारडे झुकत होते. अखेरीस येथून अनुक्रमे भाजपचे आ. मोहन मते व आ. प्रवीण दटके विजयी झाले. मते यांनी काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्यावर १५ हजार ६५८ मतांनी मात केली. वंचित बहुजन आघाडीच्या सत्यभामा लोखंडे यांना केवळ १ हजार ८९० मते मिळाली.
मध्य नागपुरात दटके यांनी काँग्रेसचे बंटी शेळके यांना ११ हजार ६३२ मतांनी हरविले. या मतदारसंघातील हलबा समाजाचे अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर यांना २३ हजार ३०२ मतांवरच समाधान मानावे लागले.
कामठी, हिंगण्यात भाजपच वरचढ कामठी मतदारसंघात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्यावर ४० हजार ९४६ मतांनी विजय मिळविला व पाच वर्षांनी पुन्हा विधानसभेत पोहोचले. तर हिंगण्यात समीर मेघे यांनी विजयाची हॅटट्रिक लगावली. त्यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) रमेशचंद्र बंग यांना ७८ हजार ९३१ मताधिक्याने पराभूत केले.
नितीन राऊत, विकास ठाकरेंनी राखला मतदारसंघ
- काँग्रेसला जिल्ह्यात तीनच जागांवर विजय मिळाला. नागपूर उत्तरमध्ये माजी मंत्री नितीन राऊत यांनी भाजपचे डॉ. मिलिंद माने यांच्यावर २८ हजार ४६७ मतांनी विजय मिळविला. बसपाच्या मनोज सांगोळे यांना १२ हजार ४८७ मते मिळाली.
- नागपूर पश्चिममध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी भाजपचे सुधाकर कोहळे यांना ५ हजार ८२४ मताधिक्याने पराभूत केले. कोहळे यांना तेथून ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली होती.
- अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांना केवळ ८ हजार १६६ मते मिळाली, तर अपक्ष राजा बेग है फक्त ६७० मतांवर थांबले. नागपूर ग्रामीणमधील उमरेडमध्ये काँग्रेसचे संजय मेश्राम यांनी भाजपचे सुधीर पारवे यांना १२ हजार ८२५ मतांनी मात दिली.
- भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार प्रमोद घरडे यांनी तब्बल ४९ हजार २६२ मते घेत भाजपला स्वतःची ताकद दाखवून दिली.