योगेश पांडे
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याचा गुरुवारी ‘स्वाईन फ्लू’मुळे मृत्यू झाला. मागील पाच दिवसांपासून संबंधित कैदी मेडिकलमध्ये उपचार घेत होता. दरम्यान, ‘स्वाईन फ्लू’च्या संसर्गाने त्याचा मृत्यू झाल्याची बाब कळताच कारागृहातील कैदी व प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे संबंधित कैदी हा नक्षल चळवळीचा मास्टरमाईंड जी.एन.साईबाबा याचा सहकारी होता. दुसरीकडे कैद्याच्या वकिलांनी मात्र त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा दावा केला आहे.पांडू नारोटे (३४) असे संबंधित कैद्याचे नाव होते. ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा व त्याचा साथीदार असलेल्या पांडू नरोटेला दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. कारागृह प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पांडू मागील काही दिवसांपासून आजारी होता. त्याला खोकला, ताप व श्वास घेण्यास अडचण होत होती. २० ऑगस्ट रोजी त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची चाचणी झाली असता त्याला ‘स्वाईन फ्लू’ झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याच्यावर वॉर्ड क्रमांक तेरामध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी त्याची प्रकृती खालावली व सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्याचे निधन झाले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.दरम्यान, ‘स्वाईन फ्लू’ संसर्गजन्य रोग असल्यामुळे कारागृहातील कैद्यांमध्ये खळबळ उडाली आहे.