म्हणे पत्नी भांडखोर आहे ! तीन अपत्यानंतर पतीची घटस्फोटासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 08:26 PM2018-10-17T20:26:33+5:302018-10-17T20:27:58+5:30
वाचून आश्चर्य वाटू शकते, पण हे खरे आहे. एक पती तीन अपत्ये जन्माला घातल्यानंतर पत्नीपासून घटस्फोट मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वाद पोहोचल्यामुळे हा धक्कादायक प्रकार पुढे आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाचून आश्चर्य वाटू शकते, पण हे खरे आहे. एक पती तीन अपत्ये जन्माला घातल्यानंतर पत्नीपासून घटस्फोट
/>मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वाद पोहोचल्यामुळे हा धक्कादायक प्रकार पुढे आला.
नागपुरातील दाम्पत्य निकिता व हर्षल (काल्पनिक नावे) यांचे ७ जून १९९७ रोजी लग्न झाले. त्यानंतर त्यांनी दोन मुली व एक मुलगा अशा तीन अपत्यांना जन्म दिला. अशा परिस्थितीत दोघांपैकी कुणीही घटस्फोटाचा विचार करू शकेल असे सहजासहजी कुणालाच वाटणार नाही. परंतु, हर्षलने हे पाऊल उचलले. त्याने निकितावर क्रूरतेचा आरोप करून त्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी १९ नोव्हेंबर २००५ रोजी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. २३ एप्रिल २०१० रोजी कुटुंब न्यायालयाने त्याला घटस्फोट नाकारून केवळ न्यायिक विभक्ततेचा आदेश जारी केला. त्या आदेशाविरुद्ध निकिताने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयात निकिता क्रूर असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. परिणामी, न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी निकिताची याचिका मंजूर करून कुटुंब न्यायालयाचा आदेश रद्द केला तसेच हर्षलचे सर्व आक्षेपही फेटाळून लावले.
निकिता तापट व संशयी स्वभावाची आहे. ती सकाळीच घरून बाहेर निघून जाते. घरची कोणतीही कामे करीत नाही. मुलांची काळजी घेत नाही. शारीरिक सहवास करू देत नाही. सतत भांडत राहते, असे आरोप हर्षलने केले होते. निकिताने लेखी उत्तर दाखल करून हे सर्व आरोप अमान्य केले. उच्च शिक्षित असल्यामुळे आपल्याला जबाबदाऱ्यांची जाणीव आहे. मार्च-२००४ पर्यंत हर्षल चांगला वागत होता. त्यानंतर त्याचा स्वभाव अचानक बदलला. विवाहबाह्य संबंधामुळे तो घटस्फोटाची मागणी करायला लागला. त्याचे कुटुंबीयांकडे दुर्लक्ष झाले, असे स्पष्टीकरण निकिताने दिले.