लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयानेमराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करताच उपराजधानीत सकल मराठा समाजाने महालच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जल्लोष केला. त्यांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी आरक्षणाच्या लढ्यात शहीद झालेल्या समाजबांधवांना मेणबत्त्या लावून आदरांजली वाहण्यात आली.राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सकल मराठा समाजबांधवांनी महालच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गर्दी केली. यावेळी जयसिंग राजे भोसले, शिरीष राजे शिर्के, मराठा महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष कविता भोसले, मराठा महासंघाचे नागपूर शहर अध्यक्ष नरेंद्र मोहिते, राजे प्रतिष्ठान साताऱ्याचे मुख्य सचिव दिलीप धनरे यांच्यासह मराठा समाजबांधव एकत्र आला. त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी एकमेकांना पेढे भरवून आरक्षणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सकल मराठा समाजबांधवांनी यावेळी जोरदार नारेबाजी केली. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देऊन महालचा शिवाजी महाराज चौक दणाणून टाकला. आरक्षणावर शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद साजरा करतानाच आरक्षणाच्या लढ्यात शहीद झालेल्या समाजबांधवांचे स्मरण यावेळी करण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद आहे, परंतु आरक्षणासाठी शहीद झालेल्या समाजबांधवांचे दु:खही असल्याचे मत नरेंद्र मोहिते यांनी व्यक्त केले. मेणबत्ती लावून दोन मिनिट मौन पाळून शहीद समाजबांधवांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी श्वेता भोसले, सचिन नाईक, कृष्णराव गायकवाड, प्रशांत निगम, लक्ष्मीकांत सूर्यवंशी, मोहन जाधव, वंदना रोटकर, महेश पवार, दत्ता शिर्के, निखील शेलार, विनोद देशमुख, तेजसिंग मोरे, मनोहर कोकाटे, विजय काळे, गुणवंत माने, गंगाधर गीते, राजेंद्र सावंत, प्रेम मोहिते, सुहास मोहिते, हेमंत भोसले, दत्ता भोसले, नंदा धनरे, वैशाली सुरतकर, गीता निंबाळकर, रवी जोरे यांच्यासह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.