- टाळेबंदीपासून सुरू झालेली पिळवणूक आताही सुरूच
आकांक्षा कनोजिया / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे लागू झालेल्या टाळेबंदीने अनेकांना समस्यांचा सामना करावा लागला. टाळेबंदीचा फटका सर्वात जास्त बसला तो महिलांना. प्राप्त माहितीनुसार २९७ अत्याचार पीडित महिला टाळेबंदीच्या काळात आपल्या तक्रारी घेऊन ‘सखी : वन स्टाॅप सेंटर’वर पोहोचल्या आहेत.
या सेंटरशी संबंधितांकडून मिळालेल्या माहितीनुसार टाळेबंदीच्या काळात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. महिला पीडितांच्या संख्येचा विचार करता केंद्र सरकारने ६ जुलै २०२० रोजी पाटणकर चौक परिसरात ‘सखी : वन स्टॉप सेंटर’ची स्थापना केली होती. या केंद्रावर गेल्या आठ महिन्यात २९७ महिलांच्या पिळवणुकीची प्रकरणे पुढे आली आहेत. यात १०१ प्रकरणे कौटुंबिक हिंसाचाराची आहेत. विशेष म्हणजे सेंटरने टाळेबंदीत ३६ कौटुंबिक प्रकरणांत समेट घडवून आणला. बाल व महिला विकास विभागाच्या देखरेखीत हे सेंटर चालविले जात आहे.
सखी : वन स्टॉप सेंटर
महिलांची पिळवणूक व अत्याचाराची प्रकरणे बघता केंद्र सरकारने या सेंटरची स्थापना केली. या सेंटरमध्ये अस्थायी तत्त्वावर महिलांना आधार दिला जातो. पोलीस या पीडित महिलाना मदत करते आणि त्यांच्या कुटुंबात सामंजस्य निर्माण करण्याचे प्रयत्न करते.
रोजगार गेल्याने पिळवणुकीत वाढ
टाळेबंदीच्या काळात मुख्यत्वे रोजगार गेल्याने आणि पुरुषांच्या व्यसनाधीनतेने महिलांच्या पिळवणुकीत वाढ झाल्याची कारणे सेंटरशी निगडित कर्मचारी सांगत आहेत. महिलांना त्रास दिल्या जात असल्याची प्रकरणे नियमित असतातच. मात्र, टाळेबंदीत या प्रकरणात वाढ झालेली आहे.
- अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नागपूर
...........