नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायतमध्ये गावातील नागरिकांच्या दस्ताऐवजाबाबत महत्त्वाची कामे करणाऱ्या संगणक परिचालकांना मागील सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याची गंभीर बाब समाेर येत आहे. तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या परिचालकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात १९,७३८ संगणक परिचालक कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीच्या एकत्रीकरणामुळे २७ हजारापैकी ७ हजार परिचालकांची गच्छंती झाली हाेती. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७४० आहे. राज्य सरकारतर्फे नियुक्त कंत्राटदार कंपनीतर्फे परिचालकांची नियुक्ती करण्यात येते. परिचालकांना ८ हजार रुपये मानधन देण्यात येते. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्यावतीने मानधनवाढ आणि शासकीय सेवेत नियमितीकरण करण्यासाठी डिसेंबरमध्ये नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात आंदाेलन करण्यात आले हाेते. तेव्हापासून ते आता एप्रिल महिन्यापर्यंत या कर्मचाऱ्यांचे मानधन मिळाले नसल्याची माहिती आहे. सरकार व जिल्हा परिषद स्तरावर सततच्या पाठपुराव्यानंतर साेमवारी जानेवारीचे मानधन दिल्याची माहिती आहे. या काळात महत्त्वाचे सण उत्सव हाेऊन गेले पण या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात गाेडधाेड झाले नाही की मुलांना कपडे घेता आले नाही, अशी व्यथा संघटनेच्या सदस्या माधुरी हटवार यांनी व्यक्त केली. राेजचा भाजीपाला, किरणा, गॅस, इलेक्ट्रीक बिल आणि औषधांचा खर्च कसा करावा, असा सवाल त्यांनी केला आहे.
परिचालकांच्या आंदाेलनानंतर ३ हजार रुपये मानधनवाढ करण्याचे आश्वासन सरकारने दिले हाेते. मानधन वाढले तर नाही पण असलेल्या मानधनाचा एक पैसा सहा महिन्यापासून मिळाला नव्हता. संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आता जानेवारीचे मानधन जमा करण्यात आले आहे. अशा गंभीर स्थितीत परिचालकांनी त्यांचे कुटुंब कसे चालवावे.- नारायण माेठे, राज्य सचिव, ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना
संगणक परिचालकांचे मानधन हे ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोग मार्फत १२,००० प्रति महिना याप्रमाणे संपूर्ण वर्षाचे एकत्रितपणे जिल्हा परिषदेला आरटीजीएस प्रणालीद्वारे अदा केले जाते. मात्र कंपनीकडून केवळ ६९०० रुपये परिचालकांना दिले जाते. कंत्राटदार काही न करता प्रत्येक संगणक परिचालकामागे ५ हजार रुपये कमावतो. हे कंपनी शाेषण हाेय.- राजानंद कावळे, कामगार नेते