ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या काटाेल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात प्रक्रिया करून तयार केलेल्या विविध फळझाडांच्या कलमांना राज्यभरात भरीव मागणी आहे. यावर्षी या केंद्रातून २२ लाख ३६ हजार ६१५ रुपये किमतीच्या ५५ हजार कलमांची विक्री करण्यात आली, अशी माहिती या संशाेधन केंद्राचे प्रमुख डाॅ. विनाेद राऊत यांनी दिली.
या फळ संशाेधन केंद्रात संत्रा, माेसंबी, पेरु, लिंबू, सीताफळ, आंबा, करवंद या फळझाडांच्या कलमा तयार केल्या जात असून, यातील संत्रा, माेसंबी, पेरुच्या कलमांना माेठी मागणी आहे. चालू हंगामात नागपुरी संत्र्याच्या १७,०००, काटोल गोल्ड मोसंबीच्या १९,०००,न्यूसेलर माेसंबीच्या ३,०००, पेरुच्या ६,०००, लिंबाच्या ३,०००, सीताफळाच्या २,००० आणि करवंदाच्या १,००० अशा एकूण ५५,००० कलमा विकण्यात आल्याची माहिती डाॅ. विनाेद राऊत यांनी दिली.
या सर्व कलमा राज्यातील धुळे, बारामती (जिल्हा पुणे), नाशिक, नांदेड, अहमदनर, वाशिम, बुलडाणा, नागपूर व अमरावती जिल्ह्यातील दाेन हजार शेतकऱ्यांनी खरेदी केल्या आहेत. संत्रा या लिंबूवर्गीय फळावर संशाेधन करणारे हे राज्यात एकमेव संशाेधन केंद्र आहे. याचा फाॅर्म काटाेल-काेंढाळी मार्गावर आहे. कर्मचारी, निधी व मजुरांची कमतरता जाणवत असल्याने संशाेधनात अडचणी येत असल्याचेही डाॅ. विनाेद राऊत यांनी स्पष्ट केले. दर्जेदार, राेगमुक्त व अधिक काळ फळांचे उत्पादन शेतकऱ्यांनी याेग्य प्रक्रिया केलेल्या परिपक्व कलमांची खरेदी करावी, असे आवाहन केले.
...
पाॅलिहाऊसचा वापर
या संशाेधन केंद्रात दरवर्षी जमिनीवर कलमा तयार केल्या जायच्या. यावर्षी पहिल्यांना सहा पाॅलिहाऊस तयार करून त्यात कलमांची निर्मिती करण्यात आली. पिशवीमध्ये संत्र्याच्या ७,०००, माेसंबीच्या ४,००० व लिंबाच्या २,००० कलमा तयार करण्यात आल्या. दर्जेदार व निकाेप कलमांची निर्मिती करून त्या शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध करून देणे हा या संशाेधन केंद्राचा मूळ उद्देश असल्याचेही डाॅ. विनाेद राऊत यांनी सांगितले.
...
मातृवृक्षाच्या दर्जावर भर
फळझाडांच्या कलमा तयार करताना मातृवृक्षाचा दर्जा सांभाळण्यावर विशेष भर दिला जाताे. या बाबी खासगी राेपवाटिका मालक करीत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार कलमा मिळत नसल्याने त्यांचे नुकसान हाेते. कलमा तयार करताना उत्कृष्ट मातृवृक्षाची निवड करून त्यावर कलम तयार केली जाते. निराेगी राहण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. शिवाय, कलमा परिपक्व झाल्यानंतरच त्यांची विक्री केली जात असल्याचेही डाॅ. विनाेद राऊत यांनी सांगितले.