लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसऱ्याच्या नावावर असलेले प्लॉट परस्पर विकून त्यापोटी एका आरोपीने साडेनऊ लाख रुपये हडपले. त्याची बनवाबनवी तब्बल सहा वर्षांनंतर उघड झाली. त्यानंतर बुधवारी नंदनवन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रमोद राजेंद्र विश्वकर्मा (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. तो जगणाडे चौकातील गल्ली नंबर ३ मध्ये राहतो.
आरोपीने भिवापूर उमरेड येथे लेआउट टाकल्याचा गवगवा केला होता. त्याचे ऑफिस केडीके कॉलेज रोडवर चंद्रप्रभा लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स नावाने सुरू केले. रेखा ज्ञानेश्वर मोहाडीकर (वय ५०, रा. मानवशक्ती नगर, खरबी) यांनी आरोपी प्रमोद विश्वकर्मासोबत ६ प्लॉटचा सौदा केला. नऊ लाख ९८ हजार रुपयांत विक्री करण्याचे ठरवून आरोपीने मोहाडीकर यांच्याकडून नऊ लाख ३४ हजार रुपये घेतले. २३ नोव्हेंबर २०१५ ला हा सौदा झाला. त्यानंतर मोहाडीकर यांनी आरोपी प्रमोदला प्लॉटची विक्री करून देण्यासाठी वारंवार मागणी केली. मात्र तो सारखा टाळाटाळ करीत होता. त्यामुळे मोहाडीकर यांनी चौकशी केली असता हे प्लॉट भलत्याच व्यक्तीच्या नावाने असल्याचे त्यांना माहीत पडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोहाडीकर यांनी आरोपी प्रमोद विश्वकर्माला आपली रक्कम परत मागितली. प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण सांगून त्याने मोहाडीकर यांना टाळले. तो रक्कम देणार नाही, हे लक्षात आल्यामुळे मोहाडीकर यांनी नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करून आरोपी प्रमोद विश्वकर्माविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी केली जात आहे.
---