लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुधाचे पाकीट फोडून त्यामध्ये खाण्याचा पिवळा रंग आणि पाणी मिसळून गाईचे दूध म्हणून विक्री करणाऱ्या दूध विक्रेत्यावर अन्न व औषध विभागाने धाड टाकली. राजेंद्र बुधराम यादव असे दूध विक्रेत्याचे नाव असून तो भोसलेवाडी, लष्करीबाग येथील रहिवासी आहे.गाईच्या दुधाला जास्त मागणी आहे. गाईचे दूध उपलब्ध नसताना इतर दुधामध्ये खाद्यरंग टाकून गाईचे दूध असल्याचे भासवून यादव फायद्यासाठी ग्राहकांची फसवणूक करीत असल्याची तक्रार विभागाकडे प्राप्त झाली होती. त्याआधारे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी अनंत चौधरी, प्रफुल्ल टोपले आणि विनोद धवड यांनी ३० ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता धाड टाकून मिश्रित दूध जप्त केले. तपासणी दरम्यान त्यांच्याकडे पिवळा खाद्य रंग आढळून आला. दूध आणि खाद्य रंगाचे नमूने घेऊन ३२० रुपये किमतीचे ८ लिटर दूध नष्ट करण्यात आले. नमुन्याचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.कोणत्याही गैरमार्गाचा उपयोग न करता ग्राहकांना फक्त सुरक्षित व आरोग्यदायक दूध उपलब्ध करून देण्याचे आवाहन केकरे यांनी सर्व दूध उत्पादकांना केले आहे. गैरप्रकार करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही व त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
पिवळा रंग मिसळून नागपुरात गाईच्या दुधाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 10:24 PM
दुधाचे पाकीट फोडून त्यामध्ये खाण्याचा पिवळा रंग आणि पाणी मिसळून गाईचे दूध म्हणून विक्री करणाऱ्या दूध विक्रेत्यावर अन्न व औषध विभागाने धाड टाकली.
ठळक मुद्देअन्न व औषध विभागाची कारवाई : जप्त दूध केले नष्ट