लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पतीच्या मृत्युनंतर निराधार झालेल्या महिलेला दोन महिलांसह तिघांनी फूस लावून पळवून नेले. तिची मध्य प्रदेशात एका व्यक्तीला पावणे दोन लाखांत विक्री केली. या घटनेची तक्रार मिळताच, बेलतरोडी पोलिसांनी तत्परता दाखवून अवघ्या २४ तासांत आरोपींना पकडले आणि पीडित महिलेला तिच्या आईच्या हवाली केले.
पीडित महिला २४ वर्षांची आहे. तिला चार वर्षांचा मुलगा असून, ती अजनीत राहते. तिच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती निराधार झाली होती. स्वतः आणि मुलाचे भरण-पोषण करण्यासाठी ती मिळेल ते काम करत होती. कधी केटरर्सच्या कामालाही जायची. आरोपी कुणाल अरुण ढेपे (वय ३७, रा. गणेशनगर कोतवाली), विभा मनोज वर्धेकर (वय ४०, रा.महाकालीनगर) आणि मुस्कान मोहब्बुदिन शेख (वय ३१, न्यू फुटाळा वस्ती) यांच्याशी तिची ओळख होती. त्यांच्यासोबत एक-दोनदा ती बाहेरही गेली होती. ती अधूनमधून आईकडेही यायची. १९ एप्रिलला ती तिच्या बेलतरोडीतील आईच्या घरी आली होती. रात्री परत जाताना आरोपी कुणाल ढेपे, विभा वर्धेकर आणि मुस्कान शेख या तिघांनी तिला फूस लावून मध्य प्रदेशातील उज्जैन जवळच्या खाबतखेडा येथे नेले. तेथील भरत रघुनाथ सोलंकी (वय २४) त्याच्याकडून एक लाख ७० हजार रुपये घेऊन आरोपींनी पीडित महिलेला त्याच्या हवाली केले.
आरोपी सोलंकीने तिला विकत घेतल्यानंतर, तो तिचा पत्नीसारखा उपभोग घेऊ लागला. त्याने तिचा मोबाइलही हिसकावून घेतला होता. तिच्यावर तो सतत पाळत ठेवायचा. गुरुवारी सकाळी संधी मिळताच पीडित महिलेने तिच्या आईच्या मोबाइलवर फोन करून, तिला आपबिती सांगितली. आपले अपहरण करून अनोळखी इसमाला विकल्याचीही माहिती दिली. विशेष म्हणजे, १९ एप्रिलला रात्री ती घरून निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत घरी पोहोचली नाही. त्यामुळे तिच्या आईने बेलतरोडी पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदविली होती. त्यामुळे मुलीचा फोन येताच, आई बेलतरोडी ठाण्यात पोहोचली. तेथे तिने मुलीने अपहरण झाले असून, तिला विकण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. ठाणेदार विजय आकोत यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.दिलीप झळके, पोलीस उपायुक्त अक्षय शिंदे यांनी त्याची गंभीर दखल घेतली. अपहृत महिलेचा फोन ज्या नंबरवरून आला होता, त्याचे लोकेशन काढण्यात आले. त्यानंतर, बेलतरोडी पोलिसांचे एक पथक गुरुवारी उज्जैनकडे पाठविण्यात आले. पोलीस पथकाने नमूद मोबाइल नंबरच्या आधारे पीडित महिला, तसेच भरत सोलंकी या दोघांचा छडा लावला. त्यांना शुक्रवारी ताब्यात घेतले आणि शनिवारी हे पथक नागपूरला पोहोचले. या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे महिलेची विक्री करणाऱ्या आरोपी कुणाल ढेपे, विभा वर्धेकर आणि मुस्कान शेख या तिघांना शनिवारी सायंकाळी पकडण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू होती.
आरोपी ढेपे सराईत गुन्हेगार
या प्रकरणातील आरोपी कुणाल ढेपे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध चोरी, घरफोडीचेही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. विकण्यात आलेल्या महिलेची माहिती मिळताच, तिचा आणि आरोपींचा छडा लावण्याची प्रशंसनीय कामगिरी ठाणेदार विजय आकोत यांच्या नेतृत्वातउपनिरीक्षक विकास अजय मनपिया, हवालदार शैलेश बडोदेकर, नायक बजरंग जुनघरे, गोपाल देशमुख यांनी बजावली.