नागपूर : बंदी असतानादेखील नागपुरात अनेक ठिकाणी ई-सिगारेट्सची विक्री करण्यात येत असल्याचे वास्तव आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माटे चौकातून लाखोंचा माल जप्त केला आहे. विशेष म्हणजे संबंधित माल दुकानात न ठेवता एका कारमध्ये ठेवण्यात आला होता.
माटे चौकातील एम.के.एंटरप्रायझेस येथे ई सिगारेट्सची विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पथकाने तेथे धाड टाकली असता पांढऱ्या रंगाची कार जवळच उभी होती. तिची झडती घेतली असता त्यात ३.१३ लाखांच्या ई-सिगारेट्स आढळल्या. पवनकुमार झारीया (२२, अवधुतनगर) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तर त्याचा साथीदार गौरव काटकर (३२, अयोध्यानगर) हा फरार झाला. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
माटे चौक, प्रतापनगर सिमेंट रोड भागात याअगोदरदेखील ई-सिगारेट्सचा साठा सापडला होता. मात्र पोलिसांकडून थातुरमातूर कारवाई करण्यात आली. या दोन्ही आरोपींकडेदेखील ई-सिगारेट्स आढळल्या होत्या. या परिसरात रात्री उशीरापर्यंत पानठेले व दुकाने उघडी असतात. तेथून तरुणांना ई-सिगारेट्सचा राजरोसपणे पुरवठा करण्यात येतो