योगेश पांडे नागपूर : एकाच फ्लॅटची एका बिल्डरने दोन व्यक्तींना विक्री करत दीड कोटींची फसवणूक करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
विजय मनी मेमन (५४, नक्षत्र अपार्टमेंट) यांनी नक्षत्र अपार्टमेंट्स येथे फ्लॅट विकत घेतला. त्यासाठी त्यांनी सुखयोग कंस्ट्रक्शन प्रा.लि.चा मोहन देशपांडे (५४, शिवाजी नगर) याच्याशी सौदा केला. ५ फेब्रुवारी २०२० ते १५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत मेमन यांनी देशपांडेच्या खात्यात दीड कोटी रुपये पाठविले. देशपांडेने केवळ सामंजस्य करार तयार केला व लवकरच रजिस्ट्री तयार करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात रजिस्ट्री केलीच नाही. दरम्यान संबंधित फ्लॅट त्याने डॉ.संजयकुमार निकोसे यांना १.२० कोटींमध्ये विकला व त्याची रजिस्ट्रीदेखील केली. ही बाब मेमन यांना कळाल्यावर त्यांनी देशपांडेला पैसे परत मागितले. मात्र त्याने पैसे परत दिले नाही. अखेर मेमन यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देशपांडेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.