योगेंद्र शंभरकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील काही फार्मा स्टॉकिस्टनी बांगलादेशच्या ढाका येथून मोठ्या प्रमाणावर रेमडेसिविर आयात केल्याची माहिती आहे. हे विदेशी इंजेक्शन प्रमाणित आहे वा नाही, याची माहिती नसून एक कुपी २० ते २५ हजारात विकली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे इंजेक्शन सोमवारी नागपुरातील काही निवडक औषध विक्रेत्यांकडे पोहोचले आहे. हे स्टॉकिस्ट चोरट्या मार्गाने परिचित डॉक्टरांच्या मागणीनुसार २० ते २५ हजारांत विकत आहेत. डॉक्टरांच्या मागणीनंतर स्टॉकिस्टचे डिलिव्हरी बॉय संबंधित खरेदीदारापर्यंत रेमडेसिविर पोहोचवित आहेत. ही रेमडेसिविरची कुपी पांढऱ्या बॉक्सच्या पॅकिंगमध्ये आली. पॅकेटच्या आतील शिशीवर ब्रॅण्डच्या नावासह ढाका, बांगलादेश लिहिले आहे. नागपूरचे काही स्टॉकिस्ट रेमडेसिविर बाहेरही निर्यात करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे, प्रशासन उत्पादक कंपन्यांकडून मर्यादित पुरवठा होत असल्याचे सांगून केवळ कोविड हॉस्पिटलला बेडच्या संख्येच्या आधारावर दरदिवशी रेमडेसिविरचे वितरण करीत आहे.
एफडीएने पैसे द्यावे, आम्ही मागवून देऊएनजीओ कृती समितीचे सचिन बिसेन म्हणाले, प्रशासन आणि एफडीए ‘मेड इन ढाका’ रेमडेसिविरची शहरात विक्री होत असल्याचे नाकारत असतील तर त्यांनी आम्हाला खरेदीसाठी पैसे द्यावेत, ते आम्ही आणून देऊ.
...तर तपासणी करूकाही लोक नेटवरून रेमडेसिविरचा फोटो व्हायरल करीत आहेत. नागपुरातील ढाका येथील रेमडेसिविरची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास चौकशी व तपासणी करू.- पुष्पहास बल्लाल, सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन विभाग
सरकारने आयात करावेविदेशातून रेमडेसिविर आयात होत असेल तर सरकारने स्वत: खरेदी करून नागरिकांना उपलब्ध करून द्यावे किंवा परवानाधारक औषध व्यावसायिकांना आयात करण्याची परवानगी द्यावी.- अजय सोनी, अध्यक्ष, फार्मासिस्ट वेलफेअर असोसिएशन.