लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : प्रतिज्ञापत्रांसह इतर लेखांसाठी १०० रुपये किमतीच्या मुद्रांका(स्टॅम्प पेपर)ची नितांत आवश्यकता असते. काटाेल शहरात काही दिवसांपासून १०० रुपये किमतीच्या मुद्रांकांचा कृत्रिम तुुटवडा निर्माण झाला असून, नागरिकांना १०० रुपयाचा मुद्रांक १२० रुपयामध्ये खरेदी करावा लागत आहे.
शेतकऱ्यांना पीक कर्ज घेणे, शासनाच्या विविध याेजनांचा लाभ घेणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे विविध प्रमाणपत्र व दाखले तयार करणे यासह प्रतिज्ञापत्र व काही लेखांसाठी १०० रुपये किमतीचा मुद्रांक शासनाने अनिवार्य केला आहे. गरजू व्यक्ती मुद्रांक खरेदी करण्यासाठी काटाेल शहरातील अधिकृत मुद्रांक विक्रेत्यांकडे जातात. त्यांना १०० रुपये किमतीच्या मुद्रांकासाठी १२० रुपये म्हणजेच २० रुपये अतिरिक्त द्यावे लागतात. अतिरिक्त रक्कम देण्यास नकार दिल्यास मुद्रांक मिळत नाही.
सध्या रबी हंगामातील पीक कर्ज व शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तयार करण्यासाठी १०० रुपयाच्या मुद्रांकाची नितांत आवश्कता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व पालक मुद्रांक खरेदी करण्यासाठी काटाेल शहरात येत आहेत. अचानक मागणी वाढल्याने काहींनी मुद्रांकाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. काही मुद्रांक विक्रेते ११० रुपये तर काही १३० रुपये घेत असल्याचे पालकांनी सांगितले. दुसरीकडे काेषागारातून पुरेसे मुद्रांक मिळत नसल्याचे मुद्रांक विक्रेत्यांनी सांगितले. हा प्रकार तहसील कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांना माहिती असूनही कुणीही याची दखल घेत नाही. या व्यवहारात नागरिकांची आर्थिक लूट हाेत असल्याने ती थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
...
कारंजा कनेक्शन काटाेल शहरात चार मुद्रांक विक्रेते आहेत. यातील तिघे सक्रिय आहेत. ते माेठ्या किमतीचे मुद्रांक विकण्यावर अधिक भर देत असून, १०० रुपये किमतीच्या मुद्रांक विकण्याकडे गांभीर्याने बघत नाहीत, असेही जाणकार व्यक्तींनी सांगितले. वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) हे तालुक्याचे ठिकाणी असून, काटाेलपासून २५ किमी अंतरावर आहे. तिथे नेहमीच १०० रुपये किमतीच्या मुद्रांकाचा तुटवडा पडताे. त्यामुळे तेथील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक काटाेल शहरातून माेठ्या प्रमाणात मुद्रांक विकत घेऊन जातात आणि तिथे ते चढ्या दराने विकतात. ते येथील मुद्रांक विक्रेत्यांना मूळ किमतीपेक्षा अधिक रक्कम देतात, असेही सूत्रांनी सांगितले.