ब्रॅण्डेड बॉटलिंग : कोट्यवधीची उलाढाल नागपूर : उपराजधानीतील पोलीस अधिवेशनाच्या बंदोबस्तात गुंतल्याची संधी साधून शहरातील कुख्यात लिकर किंगने मध्यप्रदेशातील प्रतिबंधित दारू नागपुरात आणली. अधिवेशनाच्या कार्यकाळात त्याची धडाक्यात विक्री करून या कुख्यात लिकर किंगने कोट्यवधींची उलाढाल केल्याची जोरदार चर्चा आहे.शरीराला अपायकारक असल्यामुळे मध्यप्रदेशातील दारू महाराष्ट्रात विकण्यावर बंदी आहे. तरीसुद्धा दारूच्या धंद्यात गुंतलेले काही जण मध्यप्रदेशातील ही प्रतिबंधित दारू नागपुरात आणतात आणि नागपूर जिल्हाच नव्हे तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातही ती पाठवतात. वेगवेगळ्या ‘ब्रॅण्डेड‘ मद्याच्या रिकाम्या बाटल्यात विशिष्ट ‘मिश्रण‘ करून ही दारू भरली जाते. ती काही मद्यविक्रेत्यांना हाताशी धरून ही मंडळी मद्यपींना विकून त्यांच्या आरोग्याशी खेळ केला जातो. दुसरीकडे ही प्रतिबंधित दारू विकल्या जात असल्याने राज्य शासनाचाही महिन्याचा कोट्यवधीचा महसूल बुडतो. उपराजधानीतील ‘मोंटी‘ आणि कमाल चौकाजवळचा ‘लाला‘ या धंद्यात कुख्यात आहे. काही पोलिसांना हाताशी धरून तो यातून कोट्यवधींची उलाढाल करतो. मध्यंतरी ठिकठिकाणचे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सक्रिय झाल्यामुळे या धंद्याला आळा बसला होता. अधिवेशनाच्या निमित्ताने पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी बंदोबस्त आणि अन्य जबाबदारीत गुंतल्याची संधी साधून मोंटी आणि त्याच्या साथीदारांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित दारू नागपुरात आणली. तिचे बॉटलिंग करून ती बिनबोभाट विकली गेली. यातून त्याने कोट्यवधीची कमाई केली. लेनदेनच्या व्यवहारातून एका मद्यविक्रेत्यासोबत वाद झाल्यामुळे या प्रकरणाचा बोभाटा झाला आहे. (प्रतिनिधी)एक्साईजची कारवाईची तयारीया संदर्भात उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही वेळोवेळी मध्यप्रदेशातील प्रतिबंधित आणि बनावट (मिश्रण केलेली) दारू पकडतो. या आठवड्यातही छोटी कारवाई केली. हा धंदा करणाऱ्यांवर आमची नजर असून, लवकरच मोठी कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
प्रतिबंधित दारूची धडाक्यात विक्री
By admin | Published: December 26, 2014 12:51 AM