नागपूर : अर्थव्यवस्थेला हात देणाऱ्या क्षेत्रांत ऑटोमोबाइल हे क्षेत्र आघाडीवर असून, गणेशोत्सवात वाहन खरेदी-विक्रीत उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवात दुचाकीसह चारचाकी गाड्यांच्या खरेदीवर लोकांचा जास्त भर दिसून येत आहे. मंदीचे सावट दूर झाल्याने ऑटोमोबाइल डीलर्सही आनंदी आहेत, पण अनेक चारचाकी डीलर्सकडे ठरावीक कारसाठी तीन ते चार महिन्यांचे वेटिंग आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे आणि केंद्र सरकारच्या सवलतीच्या धोरणामुळे इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे.
कारचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सेमी कंडक्टर चिपचा पुरवठा कमी होत असल्याने, निर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे लोकांना आवडत्या गाडीसाठी काही महिने वाट पाहावी लागत आहे. ग्राहकही आवडत्या गाडीसाठी वाट पाहण्यास तयार आहेत. अडचण दूर झाल्यास निर्मितीत वाढ होईल आणि लोकांना सहजपणे गाड्या उपलब्ध होतील. सध्या चारचाकीकडे लोकांचा ओढा वाढला आहे. आरटीओचे काम ऑनलाइन झाल्याने गाडीचा नंबर एकाच दिवसात ग्राहकांना मिळत आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रात दुचाकी व चारचाकी गाड्यांची सर्वाधिक विक्री होत असल्याची प्रतिक्रिया नागपुरातील डीलर्सने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
चारचाकी गाड्यांना जास्त मागणी
टाटा मोटर्सच्या गाड्यांना लोकांची पसंती वाढली असून, गणेशोत्सवात नोंदणी व खरेदीसाठी जास्त विचारणा होत आहे. सध्या कंपनीकडून पुरवठा कमी आहे. त्याचा विक्रीवर परिणाम होत आहे. लोकांची मागणी आहे. गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे, पण तुलनेत नवरात्रीत २५ टक्के जास्त विक्री होते.
कुमार काळे, संचालक, जयका मोटर्स.
चौकशी व नोंदणी जास्त
शुभमुहूर्तावर कार खरेदीसाठी लोकांची चौकशी आणि नोंदणी वाढली आहे. उपलब्ध गाड्यांची डिलिव्हरी देण्यात येत आहे. कंपनीकडून गाड्यांचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे ग्राहकाला गाडी विकता येत नाही. काही गाड्यांसाठी वेटिंग कालावधी जास्त आहे. गणेशोत्सवात विक्री वाढली आहे.
करण पाटणी, संचालक, अरुण मोटर्स मारुती सुझुकी.
ग्राहक खरेदीसाठी पाळतात मुहूर्त
ग्राहक अजूनही गाडी खरेदीसाठी शुभमुहूर्त पाळतात. त्यामुळे विक्री वाढली असून, हा ट्रेड नवरात्रीपर्यंत राहणार आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी ५० कार्सची डिलिव्हरी दिली. टाटाच्या गाड्यांना मागणी वाढली आहे. कंपनीकडून पुरवठा कमी असल्याने वेटिंग वाढले आहे. ग्राहक वाट पाहात आहेत.
डॉ.पी.के. जैन, संचालक, आदित्य टाटा मोटर्स.
दुचाकीची विक्रीची टक्केवारी वाढली
मार्केट खुले झाल्याने टीव्हीएस कंपनीच्या अद्ययावत दुचाकीला ग्राहकांची मागणी वाढली आहे. कंपनी व डीलर्सच्या ऑफर्सला चांगला प्रतिसाद आहे. उत्सवात पहिल्या दिवशी ५१ गाड्यांची डिलिव्हरी दिली. कंपनीचे चांगले मॉडेल आहेत. ग्राहक टीव्हीएसकडे वळत आहेत. हे चांगले संकेत आहे.
-विलास हरडे, संचालक, इंद्रायणी टीव्हीएस.