नागपूर : मानकापूर येथील जगदंबा हाईटस्मधील मोहित मार्टिन पीटर याच्या खूनप्रकरणी शेख सलमान शेख रहीम याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी.एस. अकाली यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. २६ जून २०१५ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मोहित मार्टिन पीटर आणि मिखील मायकल फ्रान्सिस हे दोघे जगदंबा हाईटस्स्थित मार्लिन बिल्डिंग मटेरियल ट्रान्सपोर्टच्या दुकानात बसले असता १०-१२ जणांनी सशस्त्र हल्ला करून पीटरचा भीषण खून केला होता आणि दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून नेली होती. तपासादरम्यान पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली होती. तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी तलवार, फरसा, चाकू, गुप्ती इत्यादी शस्त्रे जप्त केली होती. जामीन मागणारा आरोपी शेख सलमान याने एमएच-३१-डीआर-०२१९ क्रमांकाची मोटरसायकल आरोपी ब्रायन याला गुन्हा करण्यासाठी दिली होती. सलमान हा व्यक्तिश: या गुन्ह्यात सहभागी होता. तो मृताच्या एकूणएक हालचाली आरोपींना देत होता. बचाव पक्षाच्या वकिलाने आपल्या युक्तिवादात सांगितले की, आरोपी सलमानची गुन्ह्यातील सहभागाबाबत एफआयआरमध्ये नोंद नाही. त्याच्याकडून काहीही जप्त करण्यात आलेले नाही. त्याचा पूर्वगुन्हेगारी इतिहासही नाही. केवळ सीडीआर आणि वाहनाच्या आधारावर त्याला आरोपी बनविण्यात आले. सरकार पक्षाने असा युक्तिवाद केला की, आरोपीचे जरी एफआयआरमध्ये नाव नव्हते तरीही त्याला जखमी साक्षीदार आणि फिर्यादीने प्रत्यक्ष ओळखपरेडदरम्यान ओळखले आहे. खुनाची ही घटना दाट लोक वसाहतीत घडली होती. त्यावेळी फिर्यादी फ्रान्सिस हा आपल्या वडिलांच्या दुकानात हजर होता. मृताच्या शरीरावर शस्त्रांचे एकूण ७१ घाव होते. त्यामुळे आरोपींचा मृताला ठार मारण्याचाच हेतू होता, असे प्रथमदर्शनी दिसते. प्रकरण गंभीर असल्याने न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील एम. एम. पिंपळगावकर तर आरोपीच्या वतीने अॅड. मोहम्मद फजल यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
सलमानचा जामीन फेटाळला
By admin | Published: September 23, 2015 6:51 AM