नागपूर : मानकापूर स्टेडियमजवळ शस्त्रांसह जमलेल्या गुंडांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. हे गुंड एका गुन्हेगाराच्या हत्येची सुपारी घेऊन आले होते. ऐन वेळी पोलिसांना माहिती मिळाल्याने हत्या टळली. पोलिसांनी सुपारी प्रकरणाचा सूत्रधार सलमान रहीम शेख यालादेखील अटक केली आहे.
४ सप्टेंबर रोजी मानकापूर स्टेडियमजवळ पोलिसांनी नावेद अयाज शेखला अटक केली होती. सलमान शेख, नीलेश बोंडे, शाहबाज ऊर्फ टीपू खान व त्यांचा एक सहकारी फरार झाले होते. घटनास्थळी सलमानची कार आढळली होती. त्यात दोन माऊझर, ८ काडतूस, कट्यार इत्यादी शस्त्र होती. २००५ साली मानकापूर चौकात झालेल्या मोहित पीटर हत्याकांडात सलमानचे नाव आले होते व त्याच्या कारमधून शस्त्र जप्त झाल्याने त्याचा गंभीरतेने शोध सुरू होता. मंगळवारी रात्री तो पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने सुपारी घेतल्याची बाब सांगितली.
ज्या गुन्हेगाराच्या हत्येची सलमान गँगने सुपारी घेतली आहे तोदेखील एका हत्येच्या प्रकरणात आरोपी आहे. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आरोपीला शिक्षा होईल, असा अंदाज आहे. त्याच्या अगोदरच त्याची हत्या करण्याचा कट रचण्यात आला व सलमान गँगला सुपारी देण्यात आली. मोहित हत्याकांडातून मुक्तता झाल्यानंतर सलमानची हिंमत वाढली आहे. अनेक प्रकरणात त्याचा हात असल्याचा संशय आहे. त्याचा एक नातेवाईक गांजा तस्कर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शस्त्र तस्करांसोबत संबंध
सलमान ज्या पद्धतीने शस्त्र घेऊन पोहोचला होता, त्यावरून त्याचे नेटवर्क मोठे असल्याचा पोलिसांना संशय आहे. शस्त्र तस्करीसोबत तो जुळला असल्याचीदेखील चर्चा आहे. या दिशेने तपास केल्यास अनेक गुन्हेगारांची नावे समोर येऊ शकतात.