नागपूर : लॉकडाऊनमुळे दुकान बंद असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या एका सलून चालकाने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दिलीप कापसे (५९) यादवनगर असे मृताचे नाव आहे. कापसे यांचे पाचपावलीतील पहिल्या रेल्वे फाटकाजवळ सलून आहे. त्यांच्या परिवारात पत्नी आणि दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे लग्न झाले असून लहान मुलगी लग्न, घर खर्च आणि दुकानाच्या भाड्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. ते एकटेच काम करायचे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी जवळ असलेल्या पैशातून खर्च भागवला. परंतु पैसे संपल्यावर मात्र त्यांना चिंता सतावू लागली. सोमवारी दुपारी ते घरातून बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. सकाळी गणेशपेठ पोलिसांना गांधीसागर तलावात मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. कुटुंबीय तलावाजवळ पोहचल्यावर तो मृतदेह कापसेंचा असल्याचे उघडकीस आले.> कापसे यांच्या आत्महत्येमुळे सलून व्यावसायिकांमध्ये रोष पसरला आहे. यापूर्वी सांगली जिल्ह्यातही एकाने आत्महत्या केली आहे. तीन महिन्यांपासून सलून कामगार आर्थिक संकटात आहेत. बहुतांश जणांनी दुकान भाड्याने घेतलेले आहे. भाडे भरण्यासोबतच कुटुंबाचीही त्यांच्यावर जबाबदारी आहे. कापसे यांच्याप्रमाणेच शेकडो सलून कामगार तणावात आहेत. सरकार मदत काहीच करीत नाही आणि व्यवसाय सुरू करण्यासही परवानगी देत नाही.
नागपुरात सलून चालकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 4:36 AM