लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : काेराेनाची दुसरी लाट राेखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावून सलून व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे कामठी तालुक्यातील जवळपास १२०० सलून व्यावसायिक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. सलून दुकान बंद असल्याने नाभिकबांधवांसह त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तालुक्यात सुमारे १२०० सलून व्यावसायिक असून, प्रत्येक दुकानात कामगारांना काही टक्के मेहनताना देण्याची पद्धत आहे. यामुळे प्रत्येक कामगारांचा दरराेज पगार हाेताे. त्यातून ते घरखर्च चालवितात. परंतु दुकान बंद असल्याने पगार बंद झाला. त्यामुळे घरखर्च, कुटुंबाचे भरणपाेषण कसे करावे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. एकूणच हातावर पाेट असलेला नाभिक समाज काेराेनामुळे पूर्णत: अडचणीत सापडला आहे. काेराेनाच्या भीतीमुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने मागील वर्षी व्यवसाय बुडाला. आर्थिक समस्यांना कंटाळून मागील लाॅकडाऊनच्या काळात १६ ते १७ समाजबांधवांनी आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यानच्या काळात नाभिक समाजाने शासनाकडे वारंवार निवेदने देऊन आर्थिक मदतीची मागणी केली. मात्र त्याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यानंतर आता पुन्हा लाॅकडाऊनचे कडक निर्बंध लादल्याने नाभिक समाजावर शासनाने अन्याय केल्याचा आराेप नाभिकबांधवांचा आहे.
नाभिक समाजाने काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाच्या सर्व आदेशाचे काटेकाेर पालन करून नेहमी सहकार्य केले आहे. शिवाय सलून व ब्युटी पार्लरमधून संसर्ग झाल्याचे ऐकायला मिळाले नाही. वाहतूक व काही व्यवसायावर कडक निर्बंध लावून परवानगी दिली. त्याप्रमाणे निर्बंध लावून सलून दुकान सुरू करण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून समाजबांधवांची उपासमार हाेणार नाही, अशी मागणी नाभिक एकता मंचचे संस्थापक सचिव गजानन बाेरकर यांनी प्रसिद्धीपत्रकारद्वारे केली आहे.