आॅनलाईन लोकमतनागपूर : काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात शहीद झालेले भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांना वायूसेनेच्या विमानतळावर आदरांजली वाहण्यात आली.वायूसेनेच्या एएन-३२ या विशेष विमानाने शहीद मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांचे पार्थिव नागपूर येथील भारतीय हवाईदलाच्या एअर बेसवर रात्री ७.३० वाजता आणण्यात आले.यावेळी त्यांच्या पत्नी अबोली मोहरकर याही उपस्थित होत्या. त्यांनीही पतीला आदरांजली अर्पण केली. शवपेटीतील शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या पार्थिवावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ.परिणय फुके, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे, सवित खन्ना, ग्रुप कॅप्टन रोबिन विशोई, ए.एस. सल्होत्रा व सेना दलातील वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. आदरांजली वाहिल्यानंतर शहीद मोहरकर यांचे पार्थिव भंडारा जिल्ह्यातील पवनीकडे रवाना करण्यात आले.शहीद मेजर मोहरकर हे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील असून. केरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात त्यांच्यासह चार जवानही शहीद झाले.