लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानच्या कारभाराची चौकशी सुरू झाली आहे. आज दोन सदस्यीय चौकशी समिती नागपुरात दाखल झाली. प्रतिष्ठानमधील विविध काागदपत्रे तपासण्यात आली. कर्मचाऱ्यांशी चर्चाही करण्यात आली. उद्यासुद्धा फाईली तपासण्यात येणार आहेत.
समता प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आलेल्या विविध योजना व कार्यक्रमांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एकूणच समता प्रतिष्ठानच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिले. समता प्रतिष्ठानचे मुख्यालय नागपुरात आहे. सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे व बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये हे चौकशीसाठी नागपूर मुख्यालयात आज दाखल झाले. सोमवाारी सायंकाळपर्यंत विविध फाईल तपासण्यात आल्या. उद्यासुद्धा ते नागपुरात असून चौकशीचे काम सुरू राहील. सरकारने या समितीला महिनाभराात चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.