नागपूर : जगात पूर्वापार चालत आलेल्या साहित्य निर्मितीच्या परंपरेला मोडत साहित्यगुरू अण्णाभाऊ साठे नववास्तवादी साहित्याची निर्मिती केली आहे, त्यांचे साहित्य युवापिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन जेष्ठ नाटककार, दिग्दर्शक, नाट्य प्रशिक्षक संभाजी सावंत यांनी आज येथे केले. स्वरमंथन बहुउद्देशिय संस्था, एकलव्य युवा बहुउद्देशिय संस्था, साहस बहुउद्देशिय संस्था, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने 'साहित्यगुरू अण्णाभाऊ साठे करंडक' या राज्यस्तरिय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
राजेरघुतीनगर येथील कामगार कल्याण भवनात मंगळवारपासून स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. याप्रसंगी व्यासपीठावर दमक्षे सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, कामगार कल्याण मंडळ नागपूरचे सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड, प्रभारी कामगार विकास अधिकारी प्रतिभा भाकरे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबईचे नरेश गडेकर, ज्येष्ठ रंगकर्मी मुकूंद वसुले, रविंद्रन खडसे, संजय सोनटक्के, परीक्षक ज्येष्ठ नाटककार हरिश इथापे, डॉ. निलकांत कुलसुंगे यांच्यासह नितीन ठाकरे, प्रशांत खडसे उपस्थित होते.
दिवसभरात डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग अँड ड्रामा अमरावतीच्या 'फकीरा' एकांकिकेने स्पर्धेला प्रारंभ झाला. तन्मय बहुउद्देशीय संस्थेची 'दाभाड्यांचा वाद', आर्टिस्ट हबची 'शेरकी गर्जना', गंधर्व बहुउद्देशीय संस्थेची 'मरीआईचा गाडा', नाट्यआंदोलनची 'स्मशानातील सोनं' आणि लेक लाडकी अभियानची 'साठी' या एकांकिका सादर झाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीणा उकुंडे यांनी केले तर संचालन मंथन उकुंडे व मृण्मयी मोहरील यांनी केले. मनीषा मोहरील यांनी आभार मानले.