लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन ते चार महिन्याचे भरमसाट वीजबिल एकाच वेळी पाठवण्यात आल्याने ते कसे भरणार, अशी चिंता लोकांना लागली आहे. बिलाबाबतही लोकांमध्ये संशय असून नागरिकांमध्ये खदखद आहे. यासाठी दररोज महावितरणच्या कार्यालयात लोकांची गर्दी होत आहे. यातच एका ग्राहकाने कसेतरी तीन महिन्याचे वीज बिल एकाचवेळी भरले. परंतु महिनाभरातच त्यांना तेच बिल पुन्हा पाठवण्यात आले आहे. यावरून महावितरणचा भोंंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या प्रकारामुळे वीज ग्राहकाला मात्र धक्का बसला आहे.लॉकडाऊनच्या काळातील मार्चपासूनचे वीज बिल एकाचवेळी लोकांना पाठवले जात आहे. त्यामुळे त्याची रक्कम प्रचंड वाढलेली आहे. वीज बिल मागे घेण्याबाबतही लोक आंदोलन करीत आहेत. असे असले तरी वीज बिल भरणाऱ्यांची संख्याही कमी नाही. सरकारने हप्त्याने बिल भरण्याची सवलत दिली असली तरी तीन महिन्याचे बिल एकाचवेळी भरणाऱ्यांची संख्याही कमी नाही. एलआयजी कॉलनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसमोर राहणाºया शालिनी डांगे यांनीही त्यांचे वीज बिल एकाचवेळी भरले. चरणदास डोमाजी डांगे यांच्या नावाने वीज मीटर आहे. ४१००१०३७००३९ असा त्यांचा ग्राहक क्रमांक आहे. त्यांनाही इतरांप्रमाणेच मागच्या महिन्यात तीन महिन्याचे वीज बिल पाठविण्यात आले. तीन महिन्याचे वीज बिल ४०९० रुपये इतके आले. ८ जुलै ही बिल भरण्याची शेवटची तारीख होती. डांगे यांनी २४ जून रोजीच संपूर्ण बिल भरले. यानंतर बुधवारी २२ जुलै रोजी त्यांना पुन्हा तीन महिन्याचे भरलेले बिल परत पाठविण्यात आले. बिल पाहून त्यांना धक्काच बसला. जुलै महिन्याचे नवीन बिल येण्याऐवजी मागच्या महिन्याचे बिल जसेच्या तसेच पाठविण्यात आले आहे.
भरण्याची शेवटची तारीख ८ जुलै, बिल पाठविले २२ तारखेलाहे बिल म्हणजे महावितरणच्या भोंगळ कारभाराचे सर्वात मोठे उदाहरण आहे. सर्वात अगोदर तर बिल भरल्यानंतर तेच बिल पुन्हा ग्राहकाला यायलाच नको होते. दुसरे म्हणजे बिलामध्ये बिल भरण्याची शेवटची तारीख ८ जुलै ही स्पष्टपणे नमूद आहे, तेच बिल २२ जुलै रोजी पाठवण्यात आले आहे.