लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यात काेराेनाचा प्रकाेप वाढत असून, रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू हाेत आहे. काहींचा नागपुरात तर काहींचा गृहविलगीकरणात उपचारादरम्यान मृत्यू उद्भवताे. अशावेळी मृतांच्या अंत्यविधीसाठी समस्या निर्माण हाेते. नागपूर शहरात महानगरपालिका ही समस्या साेडवीत आहे; परंतु ग्रामीण भागात आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने अंत्यविधी करणार काेण, असा प्रश्न निर्माण हाेताे. त्यामुळे तालुका स्तरावर शहराप्रमाणे सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी केली जात आहे.
रुग्णालयात बेड न मिळाल्याने काहींचा उपचाराविना घरीच मृत्यू हाेत आहे. त्यात नागपूर शहरात मृत्यू झाल्यास संबंधित मृतदेहावर तेथेच अंत्यसंस्कार उरकला जाताे; परंतु तालुक्यात आवश्यक यंत्रणा व सुविधा नसल्याने मृतांच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मंगळवारी (दि.२०) तालुक्यातील गाेठणगाव येथील काेराेनाबाधित रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्यास कुही येथील काेविड केअर सेंटरमध्ये आणत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घाेषित केले; मात्र काेराेनाबाधित रुग्णाचा अंत्यविधी कुठे आणि करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित झाला. रुग्णाचा मृत्यू काेविड केअर सेंटर परिसरात झाल्याने त्याच्यावर कुही येथे अंत्यसंस्कार करण्याचे ठरविण्यात आले; परंतु नगर पंचायतीला कर्मचारी हजर नसल्याने समस्या निर्माण झाली. अखेर नगर पंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक देवाजी सेडमेक यांनी स्वत: पुढाकार घेत अन्य तीन सहकाऱ्यांना साेबत घेऊन मृताचे अंत्यसंस्कार पार पाडले. देवाजी सेडमेक यांच्या कार्याची सर्व स्तरातून प्रशंसा हाेत आहे.