अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिकेच्या वॉर्ड रचनेचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. आयोगाच्या या आदेशानंतर उमरेड शहरातील राजकीय पाराही आता वर चढायला लागला आहे. त्यामुळे यावेळी उमरेडचे मैदान कोण मारणार? काँग्रेसची सत्ता वापसी होईल की याही वेळीच भाजपाच, या चर्चा राजकीय गोटात सुरू झाल्या आहेत. इतकेच काय तर शहराच्या विकासासाठी तिसरा पर्याय कोण? याचीही चाचपणी केली जात आहे.
उमरेड विधानसभा क्षेत्रात गत १२ वर्षांपासून ‘पारवे’ या आडनावाचाच बोलबाला राहिलेला आहे. आधीची १० वर्षे भाजपचे सुधीर पारवे आणि आता काँग्रेसचे राजू पारवे यांनी ‘यंग ब्रिगेड’च्या बळावर मतदारसंघ ताब्यात घेतला. त्यामुळे पालिका निवडणुकीत पुन्हा एकदा पारवे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. डिसेंबर २०१७ ला पालिकेची निवडणूक झाली होती. त्यावेळी सुधीर पारवे आमदार होते. नगराध्यक्ष पदासह तब्बल १९ जागांवर ‘कमळ’ फुलले. काँग्रेसचा बालेकिल्ला पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. आता येत्या चार महिन्यात पालिका निवडणूक तोंडावर आली आहे. विद्यमान आमदार म्हणून राजू पारवे आहेत. विधानसभेच्या निकालाचा उमरेड पालिका निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
उमरेड पालिकेची सदस्य संख्या २५ आहे. यापैकी १९ जागेवर भाजप तर ६ जागेवर काँग्रेसचे नगरसेवक विजयी झाले होते. त्यावेळी प्रभाग पद्धतीमध्ये एका प्रभागात दोन सदस्य निवडणूक रिंगणात होते. आता यावेळी वॉर्डनिहाय आखणी करण्यात येणार असून, एका वॉर्डात एक सदस्य अशी निवडणूक पद्धत राहणार आहे. वॉर्ड पद्धतीमुळे लढती अतिशय चुरशीच्या आणि अटीतटीच्या ठरणार आहेत.
--
कोण ठरेल तिसरा पर्याय
सध्या भाजपाची एकहाती सत्ता असली तरी उमरेडकरांना बुचकळ्यात पाडणाऱ्या अनेक बाबी चव्हाट्यावर आल्या. काही नगरसेवकांचे ‘तळ्यात-मळ्यात’ल्या हालचालींमुळे गटागटात भाजपा विखुरलेली दिसली. नागरिकांचे प्रश्न, समस्या आणि विकास कामांवर फारसा ‘फोकस’ दिसला नाही. दुसरीकडे काँग्रेसनेही शहरातील नागरिकांसाठी विशेष काही केले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बसपा, प्रहार आणि अपक्षांसह काहींनी संघटित होत तिसरा पर्याय दिल्यास प्रमुख दोन्ही पक्षांना याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. मागील काही दिवसापासून याबाबत शहरात राजकीय हालचालीही सुरू आहेत.
--
आता सदस्यांमधून नगराध्यक्ष
डिसेंबर २०१७ ला झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक झाली. सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असलेल्या ‘त्या’ निवडणुकीत एकूण आठ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपच्या विजयलक्ष्मी भदोरिया यांनी ११,९९२ मते घेत बाजी मारली. काँग्रेसच्या सुरेखा रेवतकर यांना ८,३६८ मते मिळाली. दुसरीकडे अपक्ष उमेदवार वृषाली राऊत यांनीही काट्याची टक्कर देत ४,२९३ मते खेचली. आता येत्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सदस्यांमधूनच नगराध्यक्षाची निवड होणार असल्याने नगराध्यक्ष पदाच्या परीक्षेपूर्वी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकावी लागणार आहे. शिवाय त्यातही आरक्षण सोडत झाल्यानंतरच हे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
------------
प्रश्न-समस्या-विकास कामे
यावेळी उमरेड पालिकेची निवडणूक प्रश्न-समस्या आणि विकास कामांवर केंद्रित राहील. मागील अनेक वर्षांपासून पार्किंगचा प्रश्न अद्याप कुणीही सोडविला नाही. सुलभ संकुलाचीही समस्या गुलदस्त्यात अडकली आहे. शहरातील अनेक परिसरात उघड्या नाल्या, रस्ते आणि आरोग्याचे प्रश्न जैसे थेच आहेत. आजही मोठा अपघात वा आजार झाल्यास नागरिकांना नागपूरच्याच चकरा माराव्या लागतात. इतवारी मुख्य मार्गावर अतिक्रमणाचा विळखा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. हा प्रश्नसुद्धा ऐरणीवरच दिसून येतो. नवीन ले-आऊटमध्ये गिट्टीकरण, डांबरीकरण, गटारगंगा आदी समस्या व प्रश्न कायम आहेत. यावरही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी निवडणुकीच्या रणांगणात बघावयास मिळणार आहे.