नागपूर : नागपूरसह विदर्भातील जिल्ह्यात मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने पुणे येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. येत्या तीन दिवसात या संदर्भात अहवाल येण्याची शक्यता असून त्यानंतरच विदर्भातील स्वाईन फ्लू संदर्भातील चित्र स्पष्ट होणार आहे.
नागपूर जिल्ह्यासह काही ठिकाणी पक्षी मृतावस्थेत आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतशिवारामध्ये मृत पोपटांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळल्याची माहिती आहे. या सोबतच कावळे, मैना, साळूंखी या पक्ष्यांचाही यात काही प्रमाणावर समावेश आहे. या संदर्भात नागपूर विभागाचे सहायक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता विभागात पक्षी मृतावस्थेत आढळत असल्याच्या घटनेला त्यांनी दुजोरा दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातून मृत कावळ्यांचे, कोंढाळीतून मृत कबुतरांचे आणि पोपटांचे नमुने पाठविले आहेत.
...
कोंबड्यांचा मृत्यू नाही
विभागातील कोणत्याही जिल्ह्यात अद्याप कोंबड्या मृत झाल्याची माहिती आपल्या कार्यालयापर्यंत आली नसल्याचे सहायक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर कुंभार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची मागील तीन दिवसातील नोंद असून या यासंदर्भात पंचनामाही केला आहे. हे मृत्यू अनैसर्गिक असल्याचे पाहणीत आढळले आहे. त्यामुळे मृत पक्ष्यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्याच्या सूचनाही सर्व जिल्हा स्तरावर दिल्या आहेत.
...
स्थलांतरित पक्ष्यांसंदर्भात वन विभागाकडे पत्रव्यवहार
नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यातील पाणवठ्यावर स्थलांतरित पक्ष्यांचा सध्या वावर आहे. काही दिवस त्यांचा मुक्काम राहणार असून नंतर ते स्थलांतरित होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अधिवासाला बाधा होऊ नये, या संदर्भात पशुसंवर्धन विभागाने वन विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच सर्व तहसीलदारांनाही खबरदारीसाठी पत्र दिले आहेत.
...
वन विभागाकडूनही दक्षता
राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांच्याकडे विचारणा केली असता, आतापर्यंत ठाणे येथे बदकांच्या प्रजातीचे पक्षी मृतावस्थेत आढळले असून शनिवारी पेंचलगतच्या काटोल परिसरात पोपट मृतावस्थेत आढळल्याची माहिती दिली. सर्व वन परिक्षेत्रात मॉनिटरिंगसाठी निर्देश दिले असून मृत पक्ष्यांची माहिती पशुसंवर्धन विभागाला कळविल्याचे सांगितले.
...