नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग नागपुरात संपला आहे. आता नागपूर ते गोंदिया व नागपूर ते गडचिरोली असा नवा ‘एक्स्प्रेस वे’ बांधला जाईल. हा समृद्धी महामार्गाचा विस्तारित प्रकल्प नसेल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले.
मोपलवार म्हणाले की, नागपूर-गोंदिया हा १३५ किलोमीटरचा स्वतंत्र ‘एक्स्प्रेस वे’ बांधला जाईल. यासाठी डीपीआर तयार करण्यासाठी कन्सलटंट नियुक्त करण्यात आला आहे. या महामार्गासाठी जानेवारी २०२३ मध्ये अधिसूचना जारी केली जाईल. डीपीआर तयार झाल्यावर या प्रकल्पासाठी शासकीय जमीन, वनजमीन व खासगी जमीन किती लागेल, हे स्पष्ट होईल. ही प्रक्रिया गडचिरोली ‘एक्स्प्रेस वे’साठीही राबविली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समृद्धीचे संपूर्ण काम जुलैपर्यंत पूर्ण
- समृद्धी महामार्ग ७०० किलोमीटर लांबीचा असून, नागपूर ते शिर्डीपर्यंतचे ५२० किमीचे काम पूर्ण झाले आहे. ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रस्त्याचे नागपूर येथे लोकार्पण होईल. यानंतर उर्वरित १८० किमी रस्त्याचे काम जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे मोपलवार यांनी सांगितले. ५५ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात ४० हजार कोटी रुपये प्रत्यक्ष बांधकामावर खर्च झाले असून, आजवर ५० हजार कोटी खर्च झाले आहेत. कोरोनाच्या काळात मजूर निघून गेले. ऑक्सिजन तुडवडा यामुळे काम रखडले. त्यामुळे व्याजाची रक्कम काही प्रमाणात वाढली. समृद्धीसाठी झालेल्या उत्खननावर विविध तहसीलदारांनी चुकीच्या पद्धतीने १२०० कोटींचा दंड आकारला होता. तो राज्य सरकारने रद्द केला, असेही मोपलवार यांनी स्पष्ट केले.
बुलेट ट्रेनचा डीपीआर तयार होतोय
- समृद्धी महामार्गाला समांतर नागपूर-मुंबई बुलेट ट्रेल चालविण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनसोबत मिळून राज्य सरकार हा प्रकल्प करण्यास तयार आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार होत आहे. या प्रकल्पासाठी रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी एकूण ६ किलोमीटरचा रेडियस हवा असतो व समृद्धी महामार्गात असा ६८ टक्के भाग उपलब्ध असल्याचे मोपलवार यांनी सांगितले.
नागपूर-गोवा ‘एक्स्प्रेस वे’ साकारणार
- नागपूर-गोवा ‘एक्स्प्रेस वे’ बांधला जाणार आहे. पवनार येथून हा मार्ग सुरू होऊन गोव्यातील पाताळदेवी येथे संपेल. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी महिन्याभरात निविदा निघेल, असेही मोपलवार यांनी स्पष्ट केले.
‘समृद्धी’त काय काय?
- समृद्धी महामार्गावर एकूण २४ पेट्रोलपंप व २० फूड प्लाझा राहतील.
- टाउनशिप उभारण्यासाठी १८ जागा निवडण्यात आल्या होत्या. त्यापैकी ८ ठिकाणी प्रत्यक्ष घरबांधणी प्रकल्प उभारले जातील.
- महामार्गासोबतच गॅस पाइपलाइनही टाकण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात बुटीबोरी एमआयडीसीलाही गॅसचा पुरवठा होईल.
- या मागार्वर दररोज २५ हजार प्रवासी गाड्यांची वाहतूक होईल, असे अपेक्षित आहे.