नागपूर : मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते सकाळी ११ वाजता झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी नागपूर विमानतळावर मोदींचे स्वागत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्याहस्ते झाले. त्यानंतर, मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
पंतप्रधानांनी नागपूर विमानतळावर आगमन झाल्यावर ते नागपूर रेल्वे स्थानकावर गेले व तेथे त्यांनी नागपूर बिलासपूर वंदे भारत रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखविला. तसेच मेट्रोच्या मार्गांचेदेखील लोकार्पण केले. त्यानंतर त्यानीं मेट्रोने प्रवास केला. या प्रवासात मोदींनी मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मेट्रोतील सर्वसामान्य प्रवाशांसोबतही चर्चा केली. त्यानंतर, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वायफळ टोल नाका येथे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले. यावेळी. मोदींनी झीरो माइल्स ते वायफळ टोलनाका असा प्रवासही केला.
मोदींनी नागपूर दौऱ्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तर, ढोल-ताशांच्या गजरात सुरू असलेल्या लोकार्पण सोहळ्यातही सहभागी झाले. यावेळी, मोदींनी ढोल वाजवून आपला उत्साह दाखवून दिला. विशेष म्हणजे मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मराठी ट्विटही केलं आहे. एकूणच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याचा आनंद मुंबई, महाराष्ट्रासह दिल्लीलाही झाल्याचे मोदींच्या उत्साहावरुन दिसून येत होते.