नागपूर : सनातन धर्म हाच भारताचा सत्त्व आहे आणि अनेक आक्रमणांनी या सत्त्वाचा सर्वंकष विध्वंस करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी उत्थानाचे कार्यदेखील सुरू झाले होते. आता या सनातन धर्माचे उत्थान व्हावे, ही भगवंताचीच इच्छा असून, हेच सत्त्व धारण करणारा भारत हा हिंदू राष्ट्रच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.
संकेश्वर पीठाचे जगद्गुरु पूज्यपाद शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती यांच्यातर्फे श्री सद्गुरुदास महाराज उपाख्य ‘शककर्ते शिवरायकार’ विजयराव देशमुख यांना जाहीर करण्यात आलेला ‘धर्मभास्कर’ हा सन्मान वेदमंत्रांच्या गजरात, शंखनाद आणि धार्मिक अनुष्ठानासह प्रदान करण्यात आला, त्यावेळी भागवत अध्यक्षस्थानाहून बोलत होते. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर काशीपीठाचे गणेशशास्त्री द्राविड, प्रज्ञाचक्षु मुकुंदकाका जाटदेवळेकर, बाबा महाराज तराणेकर, कर्नाटकामधील कंपाली पीठाचे आचार्यश्री नारायणविद्या भारती, अमृताश्रम स्वामी महाराज, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मधुसूदन पेन्ना, संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. म. रा. जोशी उपस्थित होते.
सनातन धर्माचे उत्थान आणि हिंदू राष्ट्र ही भगवंताची इच्छा असली तरी तो संकल्प भगवंत तुमच्या हातून करवून घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला लढावे लागणार आहे. भारताच्या अमरत्त्वाची भविष्यवाणी सत्य होण्यासाठी धर्माचरण करणे अभिप्रेत आहे. अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद होऊ नये म्हणून तुम्हाला कृतिप्रवण व्हावे लागेल. कुठलीच गोष्ट धर्माशिवाय चालू शकत नाही. तेव्हा धर्मासाठी स्वत:ला संपवण्याची अर्थात अहंकार नष्ट करण्यासाठी प्रेरित व्हावे लागेल. ‘धर्मभास्कर’ सन्मानाच्या रूपाने सद्गुरुदास महाराजांनी प्रखरता धारण केली आहे. ती प्रखरता तुम्ही कधी धारण करणार, असा सवाल डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी उपस्थित केला. प्रास्ताविक गोविंद महाराज जाटदेवळेकर यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन वे.शा.सं. भूषणशास्त्री आर्वीकर यांनी केले. श्री गुरुमंदिर परिवार गीत अमर कुळकर्णी यांनी सादर केले. आभार स्मिता महाजन यांनी मानले.
विद्वतजन सत्ययुगात तर आपण कलियुगात : सद्गुुरुदास महाराज
- डॉ. मोहन भागवत हे सत्य युगात, विद्वान मंडळी त्रेता युगात राहतात, तर आपण सारे कलियुगात असल्याची भावना सद्गुरुदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख यांनी ‘धर्मभास्कर’ सन्मान स्वीकारताना व्यक्त केली. माझे गुरु श्री दत्तात्रेय अर्थात ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत, तर सगुण रूपात गोळवलकर गुरुजी, छत्रपती शिवाजी महाराज व विष्णुदास महाराज हे गुरु आहेत. या सगुण गुरुंकडून मी निष्ठा, निर्धार व निष्कामता मिळवली असल्याचे ते यावेळी म्हणाले.