नागपूर : अनलॉक प्रक्रिया राज्यात सुरू झाली असली तरी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने अद्याप तरी राज्यातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांना उघडण्याची परवानगी दिलेली नाही. यामुळे अभयारण्ये सलग साडेतीन महिने बंद राहणार असे दिसत आहे. तसेच नियमानुसार पावळ्यातही १५ ऑक्टोबरपर्यंत वन पर्यटन बंद राहणार आहे.
राज्यातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्ये एकदम ऑक्टोबर महिन्यातच उघडतील, असा अंदाज आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे राज्य सरकारने टप्पे पाडून अनलॉक प्रक्रिया सुरू केली. दुकाने आणि कार्यालये उघडली जात आहेत. या दरम्यान वन पर्यटन सुरू करण्यासाठी वन विभागाने प्रस्ताव पाठविला असला तरी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने (एनटीसीए) अद्यापही हिरवी झेंडी दाखविली नाही. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या मते आता ती मिळण्याची शक्यताही कमी आहे. १ जुलैपासून १५ ऑक्टोबरपर्यंत नियमानुसार पावसाळ्यात वन पर्यटन बंद असते. पावसाळ्यात जंगलातील मार्ग खराब असल्याने आणि हा काळ मिलनाचा असल्याने जंगल सफारी बंद केली जाते. यासाठी आता १५ दिवसांचा कालावधी बाकी असल्याने एनटीसीएकडून परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे.
अनलॉकमध्ये वन पर्यटन सुरू होईल, अशी पर्यटक आणि रिसॉर्टचालकाना अपेक्षा होती. मात्र पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचे असलेले ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील जंगल सफारी आता सलग ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार, असे दिसत आहे