आशिष गाेडबाेले
लाेकमत न्यूज नेटवर्क
पिपळा (डाकबंगला) : जिल्हा प्रशासनाने सावनेर तालुक्यातील कन्हान नदीवरील काही रेतीघाटांचे तीन वर्षासाठी लिलाव केले आहेत. यातील पहिल्या वर्षाची लिलाव मुदत १० जून राेजी संपली असल्याने घाटातील रेती उपसा बंद करणे अपेक्षित आहे. मात्र, पिपळा (डाकबंगला) परिसरातील रेतीघाटातून रेतीचा अवैध उपसा सुरूच आहे. या प्रकाराकडे महसूल व खनिकर्म विभागाने दुर्लक्ष केल्याने राज्य शासनाचा लाखाे रुपयांचा महसूल बुडत आहे.
पिपळा (डाकबंगला) पासून उत्तरेस पाच किमीवर कन्हान नदीचा रेतीघाट आहे. खनिकर्म विभागाने या घाटाचा सन २०२०-२१ या वर्षासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून लिलाव केला हाेता. लिलावातील अटी व शर्तीनुसार लिलावधारकास १० जून २०२१ नंतर घाटातून रेतीचा उपसा बंद करणे अपेक्षित होते. मात्र, मुदत संपल्यानंतर या घाटातून दोन पोकलॅण्ड मशीनच्या मदतीने दिवस, रात्री रेतीचा उपसा सुरूच आहे.
ही रेती टिप्परद्वारे वाहून नेली जात असून, रेतीच्या ओव्हरलाेड वाहतुकीमुळे नदीच्या परिसरासह इतर भागातील राेड खड्डेमय झाले आहेत. साेबतच नदीच्या पात्रात खड्डे तयार झाले आहेत. ते धाेकादायक असल्याने याबाबत महसूल विभागाकडे रीतसर तक्रारी करण्यात आल्या. शिवाय, घाटाच्या लिलावाची मुदत संपल्यानंतरही रेतीचा अवैध उपसा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. मात्र, कुणीही कारवाई करण्याच्या भरीस पडत नाही. त्यामुळे या घाटाकडे जाणारे सर्व मार्ग सिमेंट खांब गाठून बंद करावे, अशी मागणीही या भागातील नागरिकांनी केली आहे.
...
पात्रात खाेल खड्डे
लिलावधारक प्रमाणाबाहेर व नियमबाह्य पद्धतीने रेतीचा उपसा करीत असल्याने पात्रात माेठमाेठे खाेल खड्डे तयार झाले आहेत. काही ठिकाणी खडकापर्यंत रेतीचा उपसा करण्यात आला आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहणार असल्याने ते खड्डे जीवघेणे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात पिपळा (डाकबंगला) व परिसरातील गावांमधील नागरिकांनी तहसीलदार सतीश मासाळ यांच्याकडे लेखी व ताेंडी तक्रारीही केल्या आहेत.
...
या घाटाच्या लिलावाची मुदत १० जून राेजी संपली आहे. त्यामुळे लिलावधारक व इतरांनी घाटात रेतीचा उपसा करू नये. रेतीचा उपसा करताना कुणी आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. रेतीघाटाकडे जाणारे मार्ग बंद करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.
- सतीश मासाळ,
तहसीलदार, सावनेर.
===Photopath===
130621\0327img_20210612_101154.jpg
===Caption===
सावनेर तालुक्यातील पाटनसावंगी मंडळ अंतर्गत कन्हान नदीवरील लिलाव झालेल्या रेतीघाटावरून मुदत संपल्या नंतर हि उत्खनन करताना पोकलँड मशीन