नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणात नागपूर पोलिसांनी पाचवी अटक केली आहे. रविशंकर यादव ऊर्फ रब्बू चाचा असे या आरोपीचे नाव आहे. तो जबलपूर व जवळपासच्या परिसरातील कुख्यात वाळूमाफिया आहे. याशिवाय नागपूर पोलिसांनी या प्रकरणात चौकशीसाठी अगोदर भाजपमध्ये असलेले व आता कॉंग्रेसचे तेंदुखेडा येथील आमदार संजय शर्मा यांना चौकशीसाठी बोलविले आहे. शर्मा दोन दिवसांत चौकशीसाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शर्मा यांना चौकशीला बोलविल्यामुळे या प्रकरणाचे राजकीय धागेदोरेदेखील पोलिसांच्या हाती लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सना खान हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी व जबलपूर येथील कुख्यात गुन्हेगार अमित ऊर्फ पप्पू साहू आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अमित साहूसह धर्मेंद्र यादव नावाच्या गुन्हेगारालाही शनिवारी अटक करण्यात आली होती.
अमित साहूने जबलपूर आणि नागपूर येथील त्याच्या साथीदारांच्या मदतीने एका ३५ वर्षीय पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता. त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती व तिच्यावर दबाव टाकून त्याने तिला अनेक ओळखीच्या लोकांकडे पाठविले. तेथे त्याने तिला त्यांच्यासोबत अश्लील व्हिडीओ व फोटो काढायला लावले. त्या फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून अमित साहूने नागपुरातील अनेकांना बदनामीची भीती दाखवून ब्लॅकमेल केले व पैसे उकळले.
अमित साहूने सना यांची हत्या केल्यावर त्यांचा मृतदेह हिरण नदीत फेकला. त्यानंतर साहूचा मित्र धर्मेंद्र यादव याच्या सांगण्यावरून त्याचा उजवा हात कमलेश पटेलने सना खान यांचे मोबाइल नर्मदा नदीत फेकले. कमलेश हा वाळू तस्कर आहे. अटक करण्यात आलेला रब्बू यादवचा धर्मेंद्र मुलगा आहे. रब्बूनेदेखील सना यांचा मोबाइल नष्ट करण्यात व रॅकेटमध्ये अनेकांना जाळ्यात ओढण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मानकापूर पोलिसांनी आमदार संजय शर्मा यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. शर्मा यांची चौकशी केल्यानंतरच पोलिस पुढील कारवाईचा निर्णय घेणार आहेत.
अमित साहू व सहकाऱ्यांची नार्को टेस्ट?
दरम्यान, या प्रकरणाची ‘लिंक’ राजकारणापर्यंत गेल्याची शक्यता आहे. यामुळेच अमित साहू व त्याचे अटकेतील सहकारी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्थितीत आरोपींची नार्को टेस्ट किंवा ब्रेन मॅपिंग करण्याबाबत पोलिसांचा विचार सुरू आहे.
रब्बूनेच अमितला लपविले
सना यांची २ ऑगस्ट रोजी हत्या केल्यानंतर अमित साहूला रब्बूनेच जबलपूरमध्ये सुरक्षित जागी लपविले होते. रब्बूने सनाच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. सनाच्या मोबाइलमध्ये अनेक स्फोटक छायाचित्रे व क्लिपिंग्ज असल्याची त्याला माहिती होती. रब्बूचे मध्य प्रदेशमध्ये राजकीय व व्यापारी वर्तुळात मोठे संपर्क आहेत. त्याच्याविरोधात चौकशीतून ही बाब समोर आली. पोलिसांनी रब्बूला मंगळवारी पहाटे अटक केली. दरम्यान, या प्रकरणात जबलपूरमधील आणखी वाळूमाफिया व बुकींवर पोलिसांची नजर असून, त्यांचीदेखील चौकशी होणार आहे.
राज्यातील नेत्यांचा संबंध नाही
यासंदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी राज्यातील नेत्यांचा सना खान हत्या व समोर आलेले सेक्सटॉर्शन रॅकेट यात काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने बारीक मुद्द्यांनादेखील गंभीरतेने घेण्यात येत आहे. जबलपूरमधील काही लोकांवर संशय असून, त्यांची लवकरच चौकशी होईल, असे त्यांनी सांगितले.
कोण आहे संजय शर्मा ?
संजय शर्मा हे कॉंग्रेसचे तेंदुखेडा येथून आमदार आहेत. ते अगोदर भाजपमध्ये होते व त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. संजय शर्मा यांचा वाळू व दारूचा व्यवसाय असल्याचे स्थानिक सांगतात. तेंदुखेडा, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी येथे त्यांचा व्यवसाय पसरला आहे. त्यांचे घर, कार्यालय व गुदामांवर मागील वर्षी आयकर विभागाने धाडीदेखील टाकल्या होत्या. तसेच जून महिन्यात शर्मा यांच्या वाळू नाक्यावर गोळीबारदेखील झाला होता. अमित साहूने काही वर्षांअगोदर हत्या केली होती व त्यात राजकीय वरदहस्तातूनच तो बाहेर आला होता. अमितदेखील वाळू तस्करीत सहभागी होता व त्यातूनच त्याचा शर्मा यांच्याशी संपर्क आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.