लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : पाेलिसांनी त्यांच्या हद्दीतील नवेगाव शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. यात ट्रॅक्टर चालक व त्याचा सहकारी पळून गेला असून, पाेलिसांनी ५ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
देवलापार (ता. रामटेक) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना नवेगाव शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या शिवाराची पाहणी केली. दरम्यान, पाेलीस येत असल्याचे लक्षात येताच ट्रॅक्टर चालक व त्याच्या साथीदाराने ट्रॅक्टर राेडवर साेडून जंगलात पळ काढला. पाेलिसांनी त्या दाेघांचाही पाठलाग केला. मात्र, त्यांना पकडण्यात पाेलिसांना यश आले नाही.
दरम्यान, पाेलिसांनी त्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरची झडती घेतली असता, त्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत त्यांना रेती असल्याचे आढळून आले.
ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी रेतीसह ट्रॅक्टर ताब्यात घेतला. या कारवाईमध्ये पाच लाख रुपयांचा ट्रॅक्टर व ट्राॅली आणि पाच हजार रुपये किमतीची एक ब्रास रेती असा एकूण ५ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ट्रॅक्टर शुभम जयस्वाल, रा. वडांबा, ता. रामटेक हा चालवत हाेता, अशी माहिती ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी दिली. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.