लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्पन्न वाढविण्यासाठी भारतीय रेल्वे माल वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाय आणि योजनांवर कार्य करीत आहे. याचाच एक भाग म्हणून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने उत्पन्नाचा नवा स्रोत म्हणून पहिल्यांदा वाळूची वाहतूक केली आहे.
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर उप्पल यांच्या नेतृत्वात आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक विकास कुमार कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार तुसमर-तिरोडी रेल्वे सेक्शनमध्ये तिरोडी ते अजनीसाठी पहिल्यांदा दपूम रेल्वे नागपूर विभागाने ५८ वॅगन वाळूची न्यू ट्राफिक अंतर्गत वाहतूक केली. यामुळे विभागाला १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. ही विभागासाठी विशेष उपलब्धी आहे. यामुळे विभागाला यापुढेही अतिरिक्त माल वाहतूक मिळण्याची शक्यता असून जवळपासच्या भागात त्याचा पुरवठा करता येणार आहे. वाळूच्या वाहतुकीमुळे केवळ रेल्वेलाच फायदा होणार नसून बांधकाम व्यावसायिकांना त्वरित वाळू उपलब्ध होणार आहे. यामुळे त्वरित आणि कमी भाड्यात माल वाहतूक होऊन ओव्हरलोडींग टाळता येणार असल्याने रस्ते अपघातांची संख्याही कमी होणार आहे.
............