लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांच्या सदरमधील शासकीय निवासस्थानाच्या परिसरातून चोरट्यांनी चंदनाचे झाड चोरून नेले. रविवारी ही घटना उघडकीस आली.
सिव्हील लाईन्समधील सदर पोलीस ठाण्याच्या समोर उपायुक्त हसन यांचा बंगला आहे. मागच्या भागात नाला असून अनेक दिवसांपासून नाल्याच्या काठावर चंदनाचे झाड होते. शनिवारी रात्री संधी साधून चोरट्यांनी हे झाड कापून चोरून नेले. रविवारी सकाळी चंदन चोरीची घटना उघडकीस आल्याने बंगल्यावर तैनात पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. चोरीला गेलेल्या झाडाची किंमत साधारणता ८ ते १० हजार रुपये असावी. २४ तास पोलिसांचा बंदोबस्त असूनही चोरट्यांनी चक्क झाड कापून चोरून नेल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
---
सराईत टोळीचे काम
चंदनाची समज असलेल्या आणि चंदन चोरीत सक्रिय असलेल्या टोळीनेच ही चोरी केली असावी, असा संशय आहे. नाल्यातून चोरटे आले असावे आणि नाल्यातूनच चंदनाचे झाड घेऊन चोरटे पसार झाले असावे, असाही संशय आहे. सदर पोलिसांनी सोमवारी या चोरीची नोंद केली. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
----