लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर पडद्यामागे गेलेले उपराजधानीचे माजी महापौर संदीप जोशी यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. वंजारीनगर पुलावरून त्यांनी ‘एनएचएआय’च्या (नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया) अधिकाऱ्यांवरच जोरदार प्रहार केला आहे. असा पूल बनविणाऱ्या अधिकाऱ्यांचे काम लज्जास्पद आहे, असे ‘ट्विट’ त्यांनी केले. हे खाते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारित येते. राजकारणात गुरुस्थानी मानणाऱ्या गडकरी यांच्यावरच जोशी यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
वंजारीनगर ते अजनी हा पूल तयार झाला असून, यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे
पाच तासांनी ‘ट्विट’मध्ये ‘ट्विस्ट’
वंजारीनगरचा पूल हा सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधला आहे. ही बाब जोशी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तब्बल पाच तासांनी नवे ‘ट्विट’ केले. हा पूल ‘एनएचएआय’ नव्हे तर सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधला आहे. त्यामुळे या खात्याच्या अधिकाऱ्यांची लाज वाटते असे त्यात ते म्हणाले. आश्चर्याची बाब म्हणजे जोशी यांनी अगोदरचे ‘ट्विट’ ‘डिलीट’ केले नाही. ते ‘ट्विट’देखील कायम असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
महापौर असूनदेखील विभाग कसा माहिती नाही ?
जोशी हे सव्वा वर्ष नागपूरचे महापौर होते. त्यांच्या कार्यकाळात पुलाचे काम सुरू होते. अगदी काही दिवसांअगोदरच ते पदावरून पायउतार झाले. शिवाय भाजपच्याच सत्ताकाळात या पुलाचे काम सुरू झाले. असे असतानादेखील त्यांना शहराच्या हृद्यस्थळी असलेला पूल नेमका कोणता विभाग बांधतो आहे हे माहिती नव्हते ही बाब कोड्यात टाकणारी आहे. जोशी हे विभागासंदर्भात खरोखच अनभिज्ञ होते की राजकीय ‘चूक’ झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी नवीन ‘ट्विट’ केले, हा प्रश्न उपस्थित होत आहे.