समाजकारणातून राजकारणाची ओढ कशी ? : संघ वर्तुळात अस्वस्थता नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही प्रभागात निष्ठावान संघ स्वयंसेवकांनी नाराजीतून अचानकपणे भाजपासमोरच मोठे आव्हान उभे केले. साधारणपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणापासून दोन हात लांबच असतो, असा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येतो. मात्र अचानक राजकारणाच्या सारीपाटात उडी घेण्याची ओढ स्वयंसेवकांना झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय लढाईत काय होईल, ते येणारा काळच सांगेल. मात्र संघ संस्कारांच्या व्याख्येनुसार नाराजीमुळे राजकारणाला जवळ करणारे स्वयंसेवक नापासच झाल्याची चर्चा आहे. गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांच्यानंतर हे लोण संघ मुख्यालयाच्या भूमीत येऊन पोहोचले आहे. परंपरेला छेद जात असल्यामुळे संघ वर्तुळात निश्चितच अस्वस्थतेचे वातावरण आहे. शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकिटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र ऐनवेळी स्वयंसेवकांना डावलण्यात आले. त्यामुळे नाराज स्वयंसेवकांनी दुसऱ्या पक्षाची कास धरत किंवा थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपाला आव्हान दिले. शहरातील १० हून अधिक जागांवर नाराज कार्यकर्ते भाजप उमेदवारांविरोधातच उभे ठाकले. अखेरच्या दिवशी बहुतांश नाराजांनी आपले अर्ज मागे घेतले व आपण संघशिस्तीत असल्याचा दावा केला. मात्र धनुष्यातून बाण अगोदरच सुटून गेला होता. एरवी मनाविरोधात एखादी गोष्ट झाली तरी संघटनहिताला सर्वोच्च प्राधान्य मानून कार्य करण्याचे संघात संस्कार देण्यात येतात. मात्र या उमेदवारांनी अगोदरच बंडखोरी करून समाजकारणातून सत्ताकारणाकडे वळण्याचे पाऊल उचलले. याबाबत संघाकडून गंभीरपणे मंथन होण्याची चिन्हे आहेत.(प्रतिनिधी) राजकारणाची लागण कशी झाली? केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारामुळे भाजपाला ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यात चांगलेच यश आले. मात्र नाराजीतून झालेल्या बंडामुळे स्वयंसेवकांची पावले सत्तेकडे वळत असल्याचे दिसून आले. भाजपावर आपले थेट नियंत्रण नाही, असे संघाकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय संघ कधीही खुल्यापणाने कुठल्याही पक्षाचा प्रचार करीत नाही. समाजकारणाचा वसा हाती घेतला असताना स्वयंसेवकांना राजकारणाची लागण झाली तरी कशी? की सत्तेच्या मोहामुळे तत्त्व गुंडाळून ठेवायला ते तयार झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संघ स्वयंसेवक ‘नापास’
By admin | Published: February 08, 2017 2:56 AM