नागपूर : लोकसभा निवडणूका कुठल्याही क्षणी घोषित होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फेदेखील यासंदर्भात नियोजन सुरू आहे. संघाकडून कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रत्यक्ष प्रचार करण्यात येत नसला तरी संघ स्वयंसेवकांकडून मतदानवाढीसाठी या निवडणूकीदेखील पुढाकार घेण्यात येणार आहे. संपूर्ण देशात निवडणूकांदरम्यान संघ स्वयंसेवक देशभरात राबविणार शत प्रतिशत मतदानाची मोहीम राबविणार आहेत.शुक्रवारी नागपुरात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली. यावेळी सहसरकार्यवाह डॉ.मनमोहन वैद्य यांनी पत्रकारांना संबोधित केले. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत समाजाच्या विविध मुद्द्यांवर मंथन होईल. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पंचपरिवर्तानाच्या सूत्रांमध्ये संघाकडून नागरी कर्तव्यावरदेखील भर देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान वाढावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे डॉ.मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले. तर प्रतिनिधी सभेदरम्यान सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी शतप्रतिशत मतदानासाठी स्वयंसेवक व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात योजना बनवावी असे आवाहन केले. निवडणूकीदरम्यान देशासमोरील आव्हाने व राष्ट्रीय हिताशी निगडीत मुद्द्यांना लक्षात ठेवावे, असेदेखील ते म्हणाले.२०२५ च्या विजयादशमीपासून संघाचे शताब्दी वर्ष सुरू होईल. याअगोदर संघविस्ताराची व्यापक योजनेच्या नियोजनावर प्रतिनिधी सभेत मंथन होईल, असे डॉ.वैद्य यांनी सांगितले. यावेळी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर, सहप्रचार प्रमुख नरेंद्र कुमार व आलोक कुमार उपस्थित होते.
राममंदिरामुळे देशातील ९० टक्के गावांत संपर्कराममंदिरामुळे संघ स्वयंसेवकांचा देशभरात व्यापक जनसंपर्क झाला आहे. ९० टक्के गावांमध्ये संघाचे स्वयंसेवक प्रत्यक्षपणे पोहोचले व १९.३८ कोटी कुटुंबांना प्रत्यक्ष पवित्र अक्षत वाटप करण्यात आले. अनेक लोक प्रत्यक्ष शाखेत येत नसले तरी ते संघकार्याशी जुळू इच्छितात. संघाच्या संकेतस्थळावरील जॉईन आरएसएसच्या लिंकवर २०१७ सालापासून दरवर्षी सरासरी एक लाख रिक्वेस्ट आल्या. मागील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात हा आकडा १३ हजाह १६८ इतका होता. यंदा मात्र दोनच महिन्यात २७ हजार ३६२ रिक्वेस्ट आल्या आहेत, अशी माहितीदेखील डॉ.मनमोहन वैद्य यांनी दिली.
संघाच्या प्रशिक्षण वर्ग प्रणालीत बदलसंघाच्या प्रशिक्षण वर्ग प्रणालीत यावर्षीपासून बदल होणार आहे. अगोदर प्राथमिक, प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष वर्ग असायचे. मात्र आता संघ जाणून घेण्यासाठी तीन दिवसांचा प्रारंभिकक वर्ग, ७ दिवसांचा प्राथमिक वर्ग, १५ दिवसांचा संघ शिक्षा वर्ग, २० दिवसांचा कार्यकर्ता विकास वर्ग-१ आणि तृतीय वर्षाच्या जागेवर २५ दिवसांचा कार्यकर्ता विकास वर्ग-२ असे स्वरूप असेल. या वर्गांमध्ये व्यावहारिक प्रशिक्षणावर जास्त भर देण्यात येईल, अशी माहिती डॉ.मनमोहन वैद्य यांनी दिली. ‘लोकमत’ने मागील वर्षी यासंदर्भात सर्वात अगोदर वृत्त प्रकाशित केले होते हे विशेष.