लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मदूत भदन्त संघरत्न मानके कठोर तप करून भिक्खू झाले. त्यांनी भारतात आणि जपानमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. ते भारत-जपान यांच्यातील मैत्रीचा दुवा आहेत, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.धम्मदूत भदन्त संघरत्न मानके प्रवज्जीत जीवनाचा स्वर्णमहोत्सवी गौरव समारंभाचे आयोजन दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी भारतीय भिक्खुसंघाचे संघानुशासक भदन्त सदानंद महास्थवीर होते. प्रमुख पाहुणे म्हणून तिब्बती कॅम्प गोठणगाव येथील भदन्त लोबसांग तेन्पा, निप्पोंझा म्योहोजि शांती स्तूप वर्धाचे भदन्त मिकिओ आसाई, सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, पय्या मेत्ता संघाचे उपाध्यक्ष डॉ. बालचंद्र खांडेकर, औद्योगिक विकास महामंडळाचे आयुक्त डॉ. हर्षवर्धन कांबळे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे, गुरुदेव युवा मंचाचे ज्ञानेश्वर रक्षक, सामाजिक कार्यकर्ते भीमराव वैद्य, मिलिंंद फुलझेले उपस्थित होते. यावेळी बोलताना भदन्त सदानंद महास्थवीर म्हणाले, एकुलता एक मुलगा धम्माला दान देऊन सच्चिदानंद आणि सीताबाई मानके यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील दायित्व प्रामाणिकपणे निभावले. अशीच भावना समाजाने ठेवण्याची गरज आहे. डॉ. भाऊ लोखंडे यांनी मुलगा दान देण्याचे सच्चिदानंद मानके यांचे कार्य सम्राट अशोकाच्या परंपरेतील असल्याचे मत व्यक्त केले. भन्ते धम्मशिखर यानी संघरत्न मानके यांनी आपल्याला बुद्ध धम्मात स्थापन केल्याचे सांगितले. माजी न्यायाधीश महेंद्र गौतम यांनी संघरत्न मानके यांचे धम्मासाठी मोलाचे योगदान असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. हर्षवर्धन कांबळे यांनी भिक्खू प्रशिक्षण केंद्र ठिकठिकाणी उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी संघरत्न मानके यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन बुद्ध धम्माचा प्रचार-प्रसार केल्याची माहिती दिली. पत्रकार मिलिंंद फुलझेले, तुका कोचे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना संघरत्न मानके म्हणाले, प्रत्येकाने आपल्यातील बुद्ध उभारला पाहिजे. देशातील बुद्ध अवशेषांपैकी ३० टक्के अवशेष महाराष्ट्रात आहेत. बाबासाहेबांनी महाराष्ट्रातच धम्मदीक्षा दिली. त्यामुळे परकीय बौद्धांपुढे हात न पसरता स्व:तच्या बळावर धम्म गतिमान करण्याचे आवाहन त्यांनी केले. संचालन डॉ. वीणा राऊत यांनी केले. आभार संध्या राजुरकर यांनी मानले.