नागपूर : उपराजधानीतील जनार्दन मूनविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे निवडणूक आयोग तसेच पोलीस आयुक्तांना तक्रार करण्यात आली आहे. मूनने काही दिवसांअगोदर पत्रपरिषद घेऊन ‘आरएसएस’चा निवडणूकीत कॉंग्रेसला पाठिंबा असल्याचे वक्तव्य केले होते व तो व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल केला होता. संघाचे नाव घेत निवडणूकीचा काळात मूनने समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संघाचे महानगर कार्यवाह रविंद्र बोकारे यांनी या पत्रातून केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपुरात १९२५ साली झाली. संघाकडून आता शतकपूर्तीसाठी नियोजन सुरू आहे. बोकारे यांच्या तक्रारीनुसार मूनने काही कालावधीअगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावानेच संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सहायक निबंधकांनी त्याला नकार दिला होता. मूनने याविरोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र दोन्ही न्यायालयांनी त्याची याचिका नामंजुर केली होती. मूनच्या नावावर ‘आरएसएस’ नावाची कुठलीही संस्था नोंदणीकृत नाही. मात्र तरीदेखील विविध ठिकाणी पत्रपरिषदा घेऊन मूनकडून वक्तव्ये करण्यात येत आहेत. मूनकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा दुरुपयोग करण्यात येत असून हा प्रकार तातडीने थांबविण्यात यावा अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे.
- मूनविरोधात कारवाई करावीनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मूनने अब्दुल पाशासोबत पत्रपरिषद घेतली व ‘आरएसएसचा कॉंग्रेसला पाठिंबा’ असे वक्तव्य केले व युट्यूबवर तो व्हिडीओ बातमीच्या स्वरुपात व्हायरल केला. हा समाजात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असून मूनविरोधात तातडीने कारवाई करावी व युट्यूबवरून व्हिडीओ डिलीट करण्यात यावा अशी मागणी संघाकडून करण्यात आली आहे. पोलिसांनीदेखील मूनविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
- फेकपोस्टपासून सावध रहानिवडणूकीच्या काळात संघाचे नाव घेऊन असे प्रकार करण्यात येत आहे. संघाच्या नावावर अशा फेक पोस्ट आल्या तर त्यापासून सावध रहावे. संघाकडून अधिकृत भूमिका केवळ अधिकृत ट्वीटर हॅंडल किंवा संकेतस्थळावरच मांडण्यात येते असे स्पष्ट करण्यात आले आहे.