लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यंदाचा विजयादशमी उत्सव ऑनलाइन होणार की ऑफलाइन याबाबत स्वयंसेवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असल्याने कार्यक्रम ऑनलाइनच आयोजित होण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात लवकरच अंतिम भूमिका घेण्यात येणार असून, त्यानंतर नागपूर महानगराकडून नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संघासाठी विजयादशमी उत्सवाचे विशेष महत्त्व आहे. सरसंघचालकांच्या उद्बोधनाकडे सर्वांच्या नजरा लागून असतात. यात संघाच्या भावी कार्यक्रमांचे संकेत मिळतात. सुरुवातीला पथसंचलनाद्वारे स्वयंसेवक आपल्या अनुशासनाचा परिचय देतात. एखाद्या विख्यात व्यक्तीला अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात येते व मोठ्या संख्येने स्वयंसेवकांची उपस्थिती असते. यंदा १५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी उत्सव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम यंदादेखील मागील वर्षीप्रमाणेच होण्याची चिन्हे आहेत. ५० ते १०० निवडक स्वयंसेवकांना आमंत्रित केले जाईल. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी पथसंचलनात तीन लाइन ऐवजी दोन रांगा ठेवण्याचाही विचार केला जात आहे. मागील वर्षीदेखील २५ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन पद्धतीनेच विजयादशमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व तेव्हा ५० निवडक स्वयंसेवकांना प्रवेश देण्यात आला होता. कोरोनाच्या सर्व नियमावलीचे पालन करतच संघातर्फे विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात येईल. १५ ऑक्टोबरपर्यंत सरकार व स्थानिक प्रशासनातर्फे आणखी काय नव्या सूचना येतात, याची संघाकडून प्रतीक्षा करण्यात येत असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
स्वयंसेवकांकडून विचारणा
संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाबाबत स्वयंसेवकांमध्ये उत्सुकता असते. शहरातील सर्वच भागातून स्वयंसेवक रेशीमबाग मैदानावर एकत्रित येतात. मागील वर्षी योग, कवायती व संचलन झाले नव्हते. यंदा कार्यक्रमाचे स्वरूप कसे असणार याची स्वयंसेवकांकडून पदाधिकाऱ्यांना विचारणा होत आहे.
ऑनलाइन होणार प्रक्षेपण
कार्यक्रमाचे स्वरूप निश्चित नसले तर सरसंघचालकांचे भाषण व स्वयंसेवकांच्या कवायतींचे जगभरात ऑनलाइन प्रक्षेपण करण्याची संघाची तयारी आहे. मागील पाच वर्षांपासून दरवर्षी वेबकास्टिंग होतच असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.