नागपूर : प्रवाशांना बसस्थानकावर स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणाची अनुभूती मिळावी म्हणून एसटी महामंडळातर्फे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तपासणी समितीने नागपूर जिल्ह्यातील विविध बसस्थानकांचे निरीक्षण केले. जास्तीत जास्त प्रवासी एसटीकडे यावे, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सहा महिन्यांपासून विविध उपक्रम हाती घेतले आहे. प्रवाशांना विविध सवलतीही दिल्या जात आहे.
हे करतानाच प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व बसस्थानके चकाचक व्हावी, तेथे येणाऱ्या प्रवाशांना स्वच्छतेची अनुभूती यावी म्हणून एसटीने ‘ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान’ सुरू केले आहे. या अभियानात राज्यातील अनेक स्वच्छ आणि सुंदर बसस्थानकांना पुरस्कारही मिळणार आहे. राज्यातील कोणते बसस्थानक चांगले आणि कुठे काय उणिवा आहेत, त्याचे निरीक्षण केले जात आहे. त्यानुसार, वेगवेगळ्या समिती वेगवेगळ्या ठिकाणच्या बसस्थानकांची पाहणी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, नागपूर जिल्ह्यातील विविध बसस्थानकांची एका निरीक्षण समितीने नुकतीच पाहणी केली असून, त्या संबंधाने तसा अहवाल तयार केला आहे.